हरी अपार्टमेंट जमीनदोस्त; व्यावसायिक गाळ्यांसह पाच कुटुंबांना फटका
दिवा / आरती परब : दिवा शहरातील अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. दिवा स्टेशन रोड परिसरातील हरी अपार्टमेंट ही तळमजला अधिक एक मजली अनधिकृत इमारत महापालिकेच्या पथकाने जेसीबी आणि पोकलेनच्या सहाय्याने जमीनदोस्त केली. ऐन दिवाळीच्या सणात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
छत्रपती शिवाजी महाराज चौक ते दिवा स्टेशन रोडदरम्यान, प्रभाग क्रमांक २७ मधील दिवा पूर्व-पश्चिम उड्डाणपुलाजवळ ही इमारत होती. या इमारतीत अंदाजे पाच ते सहा व्यावसायिक गाळे असून, पाच कुटुंबे वास्तव्यास होती. त्यामुळे महापालिकेच्या या कारवाईचा फटका व्यावसायिकांसह रहिवाशांनाही बसला आहे.
ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त झिजाड आणि दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त प्रवीणकुमार फड यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दिवा शहरात अनधिकृत बांधकामांविरोधात महापालिकेने आक्रमक भूमिका घेतल्याने बांधकाम व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, ही कारवाई केवळ निवडक बांधकामांपुरती मर्यादित न राहता शहरातील सर्व अनधिकृत इमारतींवर सातत्याने होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
बेघर करणे म्हणजे विकास नव्हे!
याबाबत ठाकरे शिवसेनेचे रोहिदास मुंडे यांनी महापालिकेच्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "विकासाच्या नावाखाली सर्वसामान्यांना बेघर करणे म्हणजे विकास नव्हे. शेतकऱ्यांना मोबदला न देता आणि नागरिकांच्या पुनर्वसनाची व्यवस्था न करता सामान्य माणसाच्या घरावर बुलडोझर चालविणे योग्य नाही."

