ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने दाखला सादर करण्याची सुविधा उपलब्ध
ठाणे / MAHARASHTRA WEBNEWS
राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी सन २०२६-२०२७ या वर्षासाठी ३० नोव्हेंबर २०२६ पूर्वी हयातीचा दाखला (Life Certificate) सादर करणे आवश्यक आहे. ठाणे जिल्हा कोषागार कार्यालयांतर्गत निवृत्तीवेतन घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांनी विहित मुदतीत हा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत हयातीचा दाखला सादर करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या सोयीसाठी प्रशासनाने ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतींची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
निवृत्तीवेतनधारकांना आपल्या निवृत्तीवेतन खात्याच्या मूळ बँक शाखेत प्रत्यक्ष जाऊन बँक अधिकाऱ्यांसमक्ष स्वाक्षरी करून दाखला नोंदवता येईल. तसेच केंद्र सरकारच्या ‘जीवनप्रमाण’ (Jeevan Pramaan) पोर्टलवरून बायोमेट्रिक प्रमाणीकरणाद्वारे डिजिटल हयातीचा दाखला सादर करता येणार आहे. यासाठी https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळाचा वापर करता येईल.
अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनवर ‘Jeevan Pramaan’ ॲप डाउनलोड करून घरबसल्या देखील दाखला सादर करण्याची सुविधा आहे. याशिवाय भारतीय डाक विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेमार्फत (IPPB) पोस्टमन किंवा ग्रामीण डाक सेवकांच्या माध्यमातून सशुल्क घरपोच डिजिटल हयातीचा दाखला नोंदवता येईल.
ऑफलाईन पद्धतीने दाखला सादर करू इच्छिणाऱ्यांना विहित नमुन्यातील हयातीच्या प्रमाणपत्रावर बँक अधिकारी किंवा राजपत्रित अधिकाऱ्याची स्वाक्षरी घेऊन ते जिल्हा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जमा करता येईल. परदेशात वास्तव्यास असलेल्या निवृत्तीवेतनधारकांना तेथील भारतीय दूतावास किंवा वाणिज्य दूतावासातील अधिकृत अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून दाखला संबंधित कोषागार कार्यालयाकडे पाठवता येणार आहे.
हयातीचा दाखला विहित मुदतीत सादर न केल्यास निवृत्तीवेतन वितरणात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी ३० नोव्हेंबरपूर्वी आपला हयातीचा दाखला सादर करून सहकार्य करावे, असे आवाहन कोषागार प्रशासनाने केले आहे.
