शिक्षकांना करणार मार्गदर्शन ; राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय
नवी दिल्ली : देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी आणि पुडुचेरीच्या माजी नायब राज्यपाल डॉ. किरण बेदी यांच्याकडे केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (एनसीटीई) यांनी त्यांची राष्ट्रीय मार्गदर्शक (नॅशनल मेंटॉर) म्हणून नियुक्ती केली आहे.
शिक्षकांचे कौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक क्षमता विकसित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या मार्गदर्शन उपक्रमात त्यांचा सहभाग असणार आहे. या माध्यमातून देशभरातील शिक्षकांना अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या उद्दिष्टांशी सुसंगत असलेल्या या उपक्रमात शिक्षकांना अध्यापन पद्धती, संशोधन, मूल्यमापन आणि शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
या जबाबदारीबद्दल डॉ. किरण बेदी यांनी समाधान व्यक्त केले. अनुभवी अधिकारी, व्यावसायिक आणि शिक्षणतज्ज्ञांना पुढील पिढीच्या जडणघडणीत योगदान देण्याची संधी मिळणे ही सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डॉ. बेदी यांचा प्रदीर्घ प्रशासकीय अनुभव आणि नेतृत्वगुण शिक्षकांसाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून देशातील शिक्षकांना नवी दिशा मिळण्यास मदत होणार आहे.
.jpeg)