सुप्रिया सुळेंचे आश्वासन ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र देणार
ठाणे : प्रदीप (बाळू) पूर्णेकर यांच्या हत्याकांडाला न्याय मिळावा आणि या प्रकरणातील संपूर्ण सत्य समोर यावे, यासाठी पूर्णेकर कुटुंबीयांकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता संसदेपासून महाराष्ट्र विधानसभेपर्यंत आवाज मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे झालेल्या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राम पूर्णेकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी प्रदीप (बाळू) पूर्णेकर हत्याकांडाचा मुद्दा लोकसभेच्या अधिवेशनात उपस्थित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
तसेच महाराष्ट्र विधानसभेतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून हा विषय उपस्थित केला जाईल. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य कार्यवाही व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार असल्याचेही सुप्रिया सुळे यांनी राम पूर्णेकर यांना सांगितले.
या आश्वासनामुळे पूर्णेकर कुटुंबीयांच्या न्यायासाठीच्या लढ्याला संसदीय आणि विधिमंडळ स्तरावर हा विषय मांडण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे. आता या प्रकरणात लोकसभा, महाराष्ट्र विधानसभा आणि राज्य सरकारच्या स्तरावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

