आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी; पनवेलच्या पाणीटंचाईवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक; प्रलंबित कामांचा अधिकाऱ्यांकडे जाब, उपाययोजनांचे पालकमंत्र्यांचे आश्वासन
पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न जोरकसपणे मांडला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारी न्हावाशेवा टप्पा-३ पाणीपुरवठा योजना मार्च २०२७ पूर्वी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. या मागण्यांच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन रायगडचे पालकमंत्री तथा कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी दिले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत असून, वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा आणि उलवे यांसह सिडकोच्या विविध वसाहतींमध्ये पाणीपुरवठ्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, उपलब्ध जलस्रोत आणि वाढती मागणी यांच्यात समतोल राखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी भविष्यातील लोकसंख्या आणि नागरी विकासाचा विचार करून दीर्घकालीन नियोजन करण्याची मागणी आमदार ठाकूर यांनी केली.
पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांनी मंत्रालयात आयोजित केलेल्या आढावा बैठकीत आमदार ठाकूर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित कामांची सद्यस्थिती आणि विलंबाबाबत विचारणा केली. पाणीपुरवठ्याची वाढती मागणी, उपलब्ध पाण्याचे नियोजन, नवीन योजनांची अंमलबजावणी आणि प्रलंबित कामे यांचा आढावा घेत त्यांनी आवश्यक कार्यवाही करण्याचा आग्रह धरला.
न्हावाशेवा टप्पा-३ योजनेला प्राधान्य
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणारी न्हावाशेवा टप्पा-३ योजना पनवेलच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानली जात आहे. या योजनेतील अडथळे तातडीने दूर करून कामाला गती द्यावी आणि मार्च २०२७ पूर्वी योजना पूर्ण क्षमतेने सुरू करावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. निर्धारित कालमर्यादेत योजना पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याची सूचनाही त्यांनी केली.
मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूममधून देखरेख
न्हावाशेवा टप्पा-३ योजनेचा समावेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष वॉर रूममध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे योजनेच्या प्रगतीवर मुख्यमंत्र्यांच्या स्तरावरून देखरेख ठेवली जात आहे. यापूर्वी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत या योजनेसंदर्भात दोन बैठका झाल्या असून, मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीतही योजनेला प्राधान्य देऊन कामाला गती देण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे सहकार्य
पाणीपुरवठा योजनांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांसोबत स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे आमदार ठाकूर यांनी नमूद केले. योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक पातळीवर निर्माण होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी सहकार्य करतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, विधान परिषद आमदार विक्रांत पाटील, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, आयुक्त मंगेश चितळे, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, नगरसेवक रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण, तुकाराम सरक यांच्यासह नगरविकास विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, एमआयडीसी, सिडको आणि पनवेल महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत मांडलेल्या मागण्या आणि सूचनांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्याने पनवेलच्या पाणीप्रश्नावर दीर्घकालीन तोडगा काढण्याच्या दृष्टीने या बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.