दिवाळीच्या पूर्वसंध्येला ५० पथदिवे कार्यान्वित : आयुक्तांच्या निर्देशानंतर महापालिकेची तत्पर कार्यवाही
टिटवाळा / MAHARSHTRAWEBNEWS
दिवाळीच्या प्रकाशपर्वात टिटवाळा परिसरातील आदिवासी पाड्यांमध्येही यंदा प्रकाशाची नवी पहाट उजाडली आहे. अनेक वर्षांपासून पथदिव्यांच्या अभावामुळे अंधारात असलेल्या आदिवासी वस्त्यांमध्ये कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने ५० पथदिवे कार्यान्वित केले आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेल्या या कार्यवाहीमुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काही आठवड्यांपूर्वी टिटवाळा परिसरातील विविध आदिवासी पाड्यांमधील नागरिकांनी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन आपल्या वस्त्यांमध्ये पथदिव्यांची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. रात्रीच्या वेळी अंधारामुळे ये-जा करताना होणारी गैरसोय, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांनी आयुक्तांसमोर मांडला होता.
या मागणीची सकारात्मक दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी आदिवासी पाड्यांमध्ये पथदिवे बसविण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार महापालिकेच्या विद्युत विभागाला १०० पथदिवे बसविण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत यांच्या माध्यमातून विद्युत विभागाने कामाला वेग दिला. त्यानुसार ५ नोव्हेंबर रोजी ५० पथदिवे कार्यान्वित करण्यात आले.
यामध्ये ठाकूर पाडा येथे ६, गणेश विद्यालय व एमटीडीसीजवळील आदिवासी पाड्यात ८, गणेश मंदिराजवळील पाड्यात ११, गणेशवाडी दर्गा परिसरात ११, मिलिंद नगर येथे २, इंदिरानगरमध्ये ३, वाघमारे आळीत ४, कातकरी वस्ती येथे १ आणि आधारवाडी जेलमागील वस्तीत ४ पथदिव्यांचा समावेश आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, टिटवाळा परिसरात एकूण २२ आदिवासी पाडे असून, २०२४ ते २०२६ या कालावधीत यापूर्वी १८५ पथदिवे कार्यान्वित करण्यात आले आहेत. २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी आणखी १०० पथदिवे बसविण्याचे प्रस्तावित आहे. त्यापैकी ५० पथदिवे कार्यान्वित झाले असून, उर्वरित पथदिवेही लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.
अंधारामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी दूर झाल्याने आदिवासी बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन अल्पावधीत प्रत्यक्ष काम पूर्ण केल्याबद्दल आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह विद्युत विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यात आले. दिवाळीच्या निमित्ताने उजळलेल्या या वस्त्या म्हणजे केवळ पथदिव्यांचा प्रकाश नसून, प्रशासनाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या विश्वासाचेही प्रतीक ठरले आहेत.
