घरबसल्या करता येणार हयातीचा दाखला सादर
ठाणे \ MAHARASHTRA WEBNEWS
ठाणे महानगरपालिका, बँक ऑफ महाराष्ट्र आणि भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या ‘TMC Life Certificate Digital System’ या डिजिटल सुविधेचा शुभारंभ आज कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
या सुविधेमुळे ठाणे महानगरपालिकेच्या पेन्शनधारकांना आता घरबसल्या डिजिटल पद्धतीने जीवन प्रमाणपत्र (हयातीचा दाखला) सादर करता येणार आहे. त्यामुळे दरवर्षी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी बँकांमध्ये जाण्याची धावपळ, रांगेत उभे राहण्याचा त्रास आणि वेळेची बचत होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ आणि वयोवृद्ध पेन्शनधारकांना या सुविधेचा मोठा लाभ मिळणार आहे.
या शुभारंभप्रसंगी विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेना गटनेते पवन कदम, प्रभाग समिती अध्यक्षा मीनल संखे, प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, नगरसेवक राजेश मोरे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि संबंधित बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पेन्शनधारकांना अधिक सुलभ आणि सोयीस्कर सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महापालिकेने हे पाऊल उचलले आहे.


