एका नागरिकाच्या मृत्यूनंतर दुकानातील मिठाईचे नमुने तपासणीसाठी!
दिवा \ आरती परब : दिवाळीच्या सणानिमित्त नागरिक, कामगार आणि आप्तस्वकीयांना मिठाई वाटून आनंद साजरा करण्याची परंपरा आहे. मात्र, मुंब्र्यातील सागर स्वीट्स या मिठाईच्या दुकानातील मिठाई खाल्ल्यानंतर एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्याने परिसरात चिंता व्यक्त केली जात आहे. या मृत्यूचा आणि संबंधित मिठाईचा काही संबंध आहे का, याचा तपास अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) सुरू करण्यात आला आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित मिठाईचे दुकान बंद करण्यात आले असून, FDA कडून तपासणी सुरू आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी FDA अधिकारी प्रियांका विशे यांनी मुंब्र्यात भेट दिली. यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर स्वीट्समधील विविध प्रकारच्या मिठाईचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, त्यांचा अहवाल आल्यानंतर मिठाईच्या गुणवत्तेबाबत आणि संभाव्य दूषितेबाबत अधिक स्पष्टता येणार आहे.
दरम्यान, पोलिसांनीही संबंधित मिठाईचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. त्यामुळे FDA आणि पोलीस अशा दोन्ही स्तरांवर या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
