- मुंबई इंडियन्स (एमआय) ज्युनिअर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा
मुंबई: मुंबई इंडियन्स (एमआय) ज्युनिअर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी लक्षधाम हायस्कूल, शारदाश्रम विद्यामंदिर, जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल संघांनी विजय मिळविले.
आझाद मैदान येथे झालेल्या 14 वर्षांखालील मुले गटातील सामन्यात सौरिश देशपांडे याच्या (80 चेंडूंत 131 धावा आणि 15 धावांत 5 विकेट) सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर लक्षधाम हायस्कूलने (गोरेगाव) नॅशनल इंग्लिश स्कूलवर (विरार) आरामात विजय मिळवला. नॅथॅनियल फरेरा याने (70 चेंडूंत नाबाद 108 धावा) सौरिश देशपांडेला फलंदाजीमध्ये चांगली साथ दिली. त्यामुळे लक्षधाम स्कूलने 332 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल नॅशनल इंग्लिश स्कूलला 60 धावा करता आल्या. सौरिश याने गोलंदाजीतही चमक दाखवली.
क्रॉस मैदानावर झालेल्या 16 वर्षांखालील मुले गटातील सामन्यात प्रियांश वाडकर (95 चेंडूत 119 धावा) आणि अथर्व शेळके यांच्या (69 चेंडूत 119 धावा) बहारदार शतकांमुळे शारदाश्रम विद्यामंदिर (दादर) संघाने ऑल सेंटस हायस्कूल, भिवंडी संघावर मात केली. शारदाश्रमच्या 5 बाद 411 धावसंख्येला प्रत्युत्तर देताना रायन शेखने (5-34) घेतलेल्या पाच विकेटमुळे ऑल सेंटस हायस्कूलचा डाव 75 धावांवर आटोपला.
16 वर्षांखालील मुले गटातील आणखी एका सामन्यांत जेबीसीएन इंटरनॅशनल स्कूल संघाने (बोरिवली) सेंट फ्रान्सिस डी’असिसी हायस्कूलचा 9 विकेट राखून पराभव केला. नील नाईकने नाबाद शतक (105*) आणि 5 विकेट (5/33) घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला.