आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणावर भर देण्याचे निर्देश


ऐरोली व तुर्भे रुग्णालयांची आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून पाहणी

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील वैद्यकीय सुविधा अधिक सक्षम व दर्जेदार करण्याच्या दृष्टीने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीनंतर प्रत्यक्ष रुग्णालय पाहणी दौरा सुरू केला आहे.

या अंतर्गत तुर्भे येथील माता बाल रुग्णालय आणि ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयातील विविध विभागांना त्यांनी भेट देऊन सेवा गुणवत्तेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


विशेष वैद्यकीय सुविधा वाढवण्याचे निर्देश

ऐरोली रुग्णालयात ईएनटी, ऑर्थोपेडिक, डेंटल यांसारख्या सेवा अधिक सक्षम करण्याबरोबरच भविष्यात इन्फर्टिलिटी आणि गॅस्ट्रोलॉजी उपचार सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. तसेच पॅरामेडिकल स्टाफची कमतरता तातडीने भरून काढण्यावर भर देण्यात आला.

रुग्णांशी संवाद व सुविधांची पाहणी

आयुक्तांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सोनोग्राफी विभागात कर्मचारी कमी असल्याने रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर अतिरिक्त मनुष्यबळ देण्याचे आदेश देण्यात आले.

रुग्णालयातील पाच मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचा पूर्ण क्षमतेने वापर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच रुग्णांना दिला जाणारा आहार गुणवत्तापूर्ण असावा आणि त्याचे वेळापत्रक काटेकोर पाळले जावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.


डिजिटलायझेशन व नव्या सुविधा

रुग्णांना जलद सेवा मिळण्यासाठी केसपेपर व वैद्यकीय नोंदींचे डिजिटायझेशन करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. ऐरोली रुग्णालयात १५ दिवसांत ब्लड बँक सुरू करण्याचे तसेच सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये मिल्क बँक सुविधा सुरू करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले.


एमआरआय सुविधेची पाहणी

याचबरोबर वाशी सार्वजनिक रुग्णालयातील अत्याधुनिक एमआरआय (MRI) सेंटरची पाहणीही आयुक्तांनी केली. थ्री टेस्ला तंत्रज्ञानावर आधारित ही सुविधा लवकरच नागरिकांसाठी सुरू होणार असून ती सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिली जाणार आहे.

मेंदू, हृदय, कर्करोग आणि अंतर्गत अवयवांच्या निदानासाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यशस्वी अंमलबजावणीनंतर इतर रुग्णालयांमध्येही अशी सुविधा उपलब्ध करून देण्याचे संकेत देण्यात आले आहेत.


आरोग्य सेवेवर भर

“नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.



Post a Comment

Previous Post Next Post