दहावी परीक्षेत विना क्लास सेंच्युरी ; भरतनाट्यम आणि अभ्यासाचा सुंदर मेळ
शेखर धोंगडे \ कोल्हापूर : न्यू पॅलेस परिसरातील कु. ऋजुता पाटील हिने दहावीच्या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. संस्कृत आणि विज्ञान या विषयांत तिने १०० पैकी १०० गुण मिळवले असून, गणितात ९९, सामाजिक शास्त्रात ९८, इंग्रजीत ९५ आणि मराठीत ९२ गुण मिळवले आहेत.
‘बेस्ट ऑफ फाईव्ह’नुसार ऋजुताला ५०० पैकी ४९२ गुण मिळाले असून, भरतनाट्यम नृत्य विषयातील ८ अतिरिक्त गुणांसह तिचे एकूण गुण ५०० पैकी ५०० झाले आहेत. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा क्लास, शिकवणी किंवा ऑनलाइन मार्गदर्शन न घेता केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर तिने हे यश मिळवले आहे.
करवीर तालुक्यातील भुयेवाडी गावची रहिवासी असलेली ऋजुता सध्या न्यू पॅलेस परिसरात वास्तव्यास असून, दहावीच्या अभ्यासासोबतच तिने भरतनाट्यमचा सरावही सातत्याने सुरू ठेवला. ती भरतनाट्यममध्ये ‘विशारद’ स्तरापर्यंत पोहोचली आहे.
"लहानपणापासूनच मी चौफेर आणि सखोल वाचन करत आले. त्यामुळे भाषा विषय सोपे झाले आणि त्याचा उपयोग गणित व विज्ञान विषय अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी झाला. नियमित आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला, पण बोर्ड परीक्षेचा ताण न घेता स्वयंअध्ययनावर भर दिल्याने अतिरिक्त शिकवणीची गरज भासली नाही," असे ऋजुताने सांगितले.
ऋजुताने इयत्ता आठवीमध्ये शिष्यवृत्ती मिळवली असून राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत अभिनव उपक्रम सादर करत राज्यस्तरापर्यंत मजल मारली आहे. विज्ञान शाखेतील प्रतिष्ठित होमी भाभा परीक्षा मध्येही ती प्रात्यक्षिक स्तरापर्यंत पोहोचली होती. तसेच प्राणी कल्याण उपक्रमांमध्येही ती सक्रिय सहभाग घेत असते.
श्रीमंत माईसाहेब बावडेकर माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या ऋजुताला शिक्षक आणि पालकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुढे विज्ञान शाखा निवडून जैवपशुवैद्यकीय क्षेत्रात उच्च शिक्षण आणि संशोधन करण्याची तिची इच्छा आहे.
