वसई-विरारकरांची वाहतूककोंडीला कायमचा दिलासा



नारिंगी येथील LC-41 उड्डाणपुलाचे लोकार्पण

वसई : वसई तालुक्यातील नारिंगी येथील रेल्वे फाटक क्रमांक ४१ (LC-41) येथे उभारण्यात आलेल्या भव्य रेल्वे उड्डाणपुलाचे शुक्रवारी मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले. राज्याचे वनमंत्री तथा आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.


हा उड्डाणपूल वसई आणि विरार पूर्व-पश्चिम भागांना थेट जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरातील नागरिकांना रेल्वे फाटकामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. या पुलामुळे तो प्रश्न आता कायमस्वरूपी सुटण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या उड्डाणपुलामुळे नारिंगी, बोळिंज आणि विरार परिसरातील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. तसेच रेल्वे फाटकावर होणारी तासनतास प्रतीक्षा संपुष्टात येणार असून, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर अत्यावश्यक सेवांना आता विनाविलंब मार्ग उपलब्ध होणार आहे.



वाहतूक सुरळीत झाल्यामुळे इंधनाची बचत होऊन नागरिकांचा दैनंदिन प्रवास अधिक सुलभ आणि तणावरहित होणार आहे. स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.


उद्घाटनप्रसंगी बोलताना गणेश नाईक यांनी सांगितले की, “हा उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत रुजू करताना अत्यंत आनंद होत आहे. वसई-विरार परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही असेच सातत्याने प्रयत्नशील राहू.”


या प्रकल्पामुळे वसई-विरार पट्ट्यातील पायाभूत सुविधांना नवा वेग मिळणार असून, भविष्यातील वाढत्या वाहतूक गरजांसाठीही हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे.



Post a Comment

Previous Post Next Post