दिवा \ आरती परब : ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या दिवा शहरात विकासाच्या घोषणा होत असल्या, तरी मूलभूत सुविधांच्या बाबतीत नागरिकांना आजही गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दिवा पश्चिम येथील गावठाणातील स्मशानभूमीची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली असून, पालिकेच्या दुर्लक्षामुळे अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे या स्मशानभूमीवर अद्यापही पक्के छत नसल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात अंत्यविधी करताना नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर “उघड्यावर अंत्यसंस्कार कसे करायचे?” असा संतप्त सवाल स्थानिक ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
शासकीय नोंदीत स्मशानभूमी अस्तित्वात असूनही प्रशासनाने वर्षानुवर्षे या ठिकाणी कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. अखेर पालिकेच्या निष्क्रियतेला कंटाळून ग्रामस्थांनीच पुढाकार घेत लोकवर्गणीतून स्मशानभूमीचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे.
स्थानिक नागरिकांनी स्वखर्चातून मातीची भरणी, लोखंडी बर्नर बसवणे तसेच सिमेंटचा चौथरा उभारण्याचे काम केले. मात्र, ज्या सुविधा महानगर पालिकेकडून अपेक्षित होत्या, त्या नागरिकांनाच उभाराव्या लागल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या स्मशानभूमीत छत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच पुरेसा प्रकाश यांचा पूर्णपणे अभाव आहे. पावसाळ्यात चिता पेटवताना पावसामुळे ती विझू नये म्हणून नातेवाईकांना अक्षरशः कसरत करावी लागते, अशी व्यथा नागरिकांनी मांडली.
पालिकेला वारंवार निवेदने देऊनही कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्मशानभूमीसारख्या संवेदनशील विषयाकडे ठाणे महानगरपालिका आता तरी गांभीर्याने लक्ष देणार का, असा प्रश्न दिव्यातील नागरिक विचारत आहेत.
