डोंबिवली : श्री सम्मेत शिखरजी या पवित्र जैन तीर्थ क्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याच्या झारखंड सरकारच्या निर्णयाविरुद्ध शनिवारी नेहरू मैदान येथे डोंबिवली जैन महासंघाने आयोजित केलेल्या निषेध रॅलीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सहभागी होऊन या लढ्याला जाहीर समर्थन दिले. आपल्या संघर्षात कुठेही संविधानाला धक्का पोहोचू नये याची काळजी घेणंही भारतीय म्हणून तितकंच महत्त्वाचं आहे.
केंद्रात असणारे आपलं सरकार कुठल्याही समाजावर असा अन्याय होऊ देणार नाही, याची खात्री आहे. त्यामुळे हे प्रकरण धीरानं घेऊन आपलं म्हणणं संविधानिक पद्धतीने मांडूया. तुम्ही माझं एवढं नक्की ऐकाल अशी मला आशा आहे असे यावेळी मंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले.यावेळी बाळासाहेबांची शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, सागर जैन यांसह अनेक जण उपस्थित होते.
