प्रवाशांची लूट आणि वादाला बसणार आळा!
ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील रिक्षाचालकांची अरेरावी, मनमानी भाडे आकारणी आणि प्रवाशांची होणारी अडवणूक याला आळा घालण्यासाठी आता प्री-पेड रिक्षा सेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपर्यंत या योजनेला राज्य शासनाची मंजुरी मिळण्याची शक्यता असून, त्यानंतर लवकरच ठाणे शहरात प्री-पेड रिक्षा सेवा सुरू होणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली.
प्री-पेड रिक्षा व्यवस्थेमुळे रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशाला आपल्या गंतव्यस्थळाचे निश्चित भाडे आधीच समजणार आहे. प्रवाशाने निश्चित भाडे भरल्यानंतर त्याला रिक्षा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे भाड्यावरून होणारी घासाघीस, मनमानी दर आकारणी, प्रवाशांना गंतव्यस्थळी जाण्यास नकार देणे तसेच प्रवास पूर्ण झाल्यानंतर भाड्यावरून होणारे वाद कमी होण्यास मदत होणार आहे. परिणामी ठाणेकरांना अधिक पारदर्शक, सुलभ आणि सुरक्षित रिक्षा सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
ठाणे स्टेशन परिसरातील वाहतूक समस्यांचा मागील आठवड्यात पाहणी दौरा केल्यानंतर शासकीय विश्रामगृहात आरटीओ, वाहतूक शाखा आणि लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील विविध वाहतूक समस्यांवर सविस्तर चर्चा करून तातडीने करावयाच्या उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात आले.
स्टेशन परिसरातील काही रिक्षाचालकांकडून होणारी मुजोरी आणि अरेरावी रोखण्यासाठी गर्दीच्या सकाळच्या आणि सायंकाळच्या वेळेत आरटीओचे दोन अधिकारी प्रत्येकी चार तास स्टेशन परिसरात उपस्थित राहणार आहेत. या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे रिक्षाचालकांच्या गैरवर्तनावर नियंत्रण ठेवण्यासोबतच स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थाही सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, वागळे इस्टेट, कोपरी, इंदिरानगर यांसह ठाणे शहरातील विविध भागांमधील वाहतूक कोंडीच्या प्रश्नांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली. गर्दीच्या चौकांमध्ये कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची व्यवस्था करण्याबाबतही पुढील कार्यवाही करण्याचे ठरविण्यात आले.
ठाणेकरांना दैनंदिन प्रवासात त्रास होऊ नये, प्रवाशांची अडवणूक होऊ नये आणि शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक शिस्तबद्ध व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. प्रवाशांना सुरक्षितता, सुविधा आणि सन्मान मिळाला पाहिजे, यासाठी वाहतूक व्यवस्थेत आवश्यक बदल केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीला वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, नगरसेवक भरत चव्हाण, अमित सरय्या, अनिता यादव, जयेंद्र कोळी, विशाल वाघ आदी उपस्थित होते.
.jpg)