महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात
मुंबई : महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा आता अगदी काही दिवसांवर आलेली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये क्रीडा ज्योत काढण्यात येत आहे. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योतीचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई विभागातील क्रीडा ज्योत रॅलीची सुरुवात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता मुंबईतील भव्य दिव्य अशा गेट वे ऑफ इंडिया येथून करण्यात आली. क्रीडा ज्योत रॅलीचे उद्घाटन मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी डॉ. कल्याण पांढरे, ध्यानचंद क्रीडा पुरस्कार्थी प्रदीप गंधे यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय शेटे, महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार्थी उदय देशपांडे, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे सचिव गोविंद मुत्युकुमार, स्क्वॉश महासंघाचे सहसचिव दयानंद कुमार, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, दादोजी कोंडदेव पुरस्कार्थी भास्कर करकेरा, मुंबई तलवारबाजी संघटनेचे सचिव राहुल वाघमारे, सुमित पाटील, आनंद वाघमारे, सिद्धेश घाग, वीरेंद्र गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
राज्यात क्रीडामय वातावरण निर्माण करुन विविध खेळांना उत्तेजन देण्यासाठी तसेच आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपले नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी व राष्ट्रीय खेळ स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी. महाराष्ट्र राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने २ ते १२ जानेवारी, २०२३ या कालावधीत बालेवाडी, पुणे, नाशिक, नागपूर, औरगाबाद, अमरावती, लातूर, कोल्हापूर, बारामती, जळगाव, मुंबई या ठिकाणी करण्यात येणार आहे.
क्रीडा ज्योत रॅलीमध्ये मुंबई जिल्ह्यातील तायक्वांदो, थ्रोबॉल, किक बॉक्सिंग, जिम्नॉस्टिक्स, शूटींग, फेन्सिंग, सॉफ्ट टेनिस या खेळाचे पदाधिकारी, राष्ट्रीय खेळाडू, एनसीसी कॅडेट, भारत स्काऊट गाईड अधिकारी, कॅडेट यांच्या उपस्थितीत भारतमातेचा व छत्रपती शिवरायांचा जयघोष करत ही क्रीडा ज्योत रॅली गेट वे ऑफ इंडिया येथून मोठ्या दिमाखात निघून रिगल सर्कल-लायन्स गेट-ओल्ड कस्टम हाऊस-आरबीआय जीपीओ पोस्ट ऑफीस-सीएसटी येथे थांबून बृहन्मुंबई महानगरपालिका समोर सेल्फी पाँईट तयार करण्यात आलेला होता त्याठिकाणी उपस्थित मान्यवरांचे व इतर पदाधिकाऱ्यांचे आभार मानून क्रीडा ज्योत चेंबूर येथे रवाना झाली. चेंबूर येथून वाशी मार्गे पनवेल-लोणावळा-येरवडा पुणे येथे क्रीडा ज्योत हस्तांतरीत करण्यात येणार आहे.
शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी खेळ खेळणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रत्येकाने कुठला तरी खेळ खेळला पाहिजे. महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंनी अधिकाधिक यश संपादन करावे. जेणेकरून मुंबईचा लौकिक वाढेल.
डॉ. कल्याण पांढरे
उपजिल्हाधिकारी,मुंबई शहर
