- २०२३ ची नागरी दैनंदिनी माहितीने परिपूर्ण व उपयुक्त
- सुशोभित मुंबईच्या छायाचित्रांचा समावेश
- मान्यवरांच्या उपस्थितीत नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेची नागरी दैनंदिनी २०२३ ही बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित विविधांगी माहितीने परिपूर्ण आहे. तसेच सन २०२३ ची दिनदर्शिकादेखील अतिशय आकर्षक व उपयुक्त आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ऐतिहासिक इमारती व विविध ठिकाणी आकर्षक रोशणाई करण्यात आली होती. या सुशोभित मुंबईच्या आकर्षक छायाचित्रांनी यंदाच्या दिनदर्शिकेचे प्रत्येक पान सजलेले असल्याने ही दिनदर्शिका निश्चितच लक्ष वेधून घेणारी झाली आहे, असे उद्गार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी काढले. ते आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे प्रकाशित व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुद्रणालयाद्वारे मुद्रित करण्यात आलेल्या सन २०२३ च्या मराठी ‘नागरी दैनंदिनी २०२३’ (Civic Diary - 2023) आणि ‘दिनदर्शिका २०२३’ चे प्रकाशन करतेवेळी उपस्थितांशी संवाद साधताना बोलत होते.
या प्रकाशन प्रसंगी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, सह आयुक्त (आयुक्त कार्यालय) चंद्रशेखर चोरे, सहआयुक्त (सामान्य प्रशासन) संजोग कबरे, सहाय्यक आयुक्त (मालमत्ता) प्रशांत गायकवाड या मान्यवरांची विशेष उपस्थिती होती. तसेच जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, महानगरपालिका मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुधीर तळेकर आदी अधिकारी देखील यावेळी उपस्थित होते.
मुंबईकर नागरिकांना महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात येणा-या सोयीसुविधांची तपशिलवार माहिती आणि पदाधिकारी व अधिकारी, विभाग इत्यादींचे अद्ययावत संपर्क तपशील नागरी दैनंदिनीच्या माध्यमातून मुंबईकरांपर्यंत पोहचत असतात. या नागरी दैनंदिनीला नागरिकांकडून दरवर्षी मोठी मागणी असते. महानगरपालिकेचे जनसंपर्क खाते सन १९५८ पासून ‘नागरी दैनंदिनी’ (सिव्हिक डायरी) प्रकाशित करीत असून यंदा नागरी दैनंदिनीचे ६५ वे वर्ष आहे. नागरी दैनंदिनी ६५ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित करीत असताना ती महत्त्वपूर्ण माहितीसह परिपूर्ण असेल, यावर दरवर्षी भर दिला जातो.
यावर्षीच्या नागरी दैनंदिनीमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माहितीसह महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ, मुंबईतील सन्माननीय खासदार, सन्माननीय विधिमंडळ सदस्य यांच्यासह महानगरपालिका आयुक्त, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सहआयुक्त, उपायुक्त आणि इतर पालिका अधिकारी यांचे संपर्क क्रमांक आहेत. महानगरपालिका पुरवित असलेल्या विविध नागरी सेवा- सुविधांची माहितीदेखील दैनंदिनीमध्ये समाविष्ट आहे. तसेच महत्त्वाचे नागरी संपर्क क्रमांक, सार्वजनिक सुट्टय़ा, नागरी प्रशासनाची माहिती अशी विविध उपयुक्त माहिती व महानगरपालिकेशी निगडित काही छायाचित्रेही या दैनंदिनीत आहेत.
तर यंदाच्या नागरी दिनदर्शिकेमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त म्हणजेच दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजीच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सुशोभित मुंबईची आकर्षक व कलात्मक छायाचित्रे प्रत्येक पानावर समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय, भारताचे प्रवेशद्वार अर्थात गेट वे ऑफ इंडिया, मंत्रालय, भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एल आय सी चे मुख्यालय, दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृति दालन, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट येथील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयाची इमारत, माहिम चौपाटी येथील निरिक्षण मनोरा, दक्षिण मुंबईतील महानगरपालिकेचे सेठ आत्मासिंह जेठसिंह बांकेबिहारी कान - नाक - घसा रुग्णालय, नेताजी सुभाष मार्ग (मरिन ड्राईव्ह), हुतात्मा चौक येथील हुतात्मा स्मारक आणि दादर येथील चैत्यभूमी परिसराचे प्रवेशद्वार या ठिकाणांच्या छायाचित्रांचा समावेश आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ऐतिहासिक व महत्त्वाच्या ठिकाणांशी संबंधित छायाचित्रे यांचा समावेश असलेली दिनदर्शिका आणि माहितीपूर्ण नागरी दैनंदिनी यांची संकल्पना, आरेखन (Desing), व त्यासाठीचे छायाचित्रण इत्यादी बाबी या महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाच्या पुढाकाराने करण्यात आल्या आहेत. तर नागरी दैनंदिनी व दिनदर्शिकेचे मुद्रण हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्याच भायखळा येथील मुद्रणालयातील अत्याधुनिक यंत्र सामुग्रीच्या आधारे करण्यात आले आहे. यानुसार सदर दोन्ही प्रकाशनांसाठीची सर्व कार्यवाही ही महानगरपालिकेच्या अंतर्गत स्तरावरच करण्यात आली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी यानिमित्ताने दिली आहे.

