दिवा \ आरती परब : स्थानिक स्ट्रीट फूडला आधुनिक आणि व्यवस्थित स्वरूप देण्याच्या उद्देशाने दिव्यात ‘रोको वडापाव’ या नव्या ब्रँड सुरू होत आहे. पारंपरिक चवीला आधुनिक सादरीकरणाची जोड देत हा उपक्रम स्थानिक बाजारपेठेत वेगळा ठसा उमटवण्याच्या तयारीत आहे.
दिवा परिसरात वेगाने वाढणाऱ्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थांची मागणी वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर वडापाव या लोकप्रिय पदार्थाला नव्या पॅकेजिंग आणि ब्रँडिंगसह ग्राहकांसमोर आणण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
या उपक्रमामागे दिव्यातील स्थानिक नेतृत्व नगरसेवक शैलेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून, लघुउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. व्यवसायाच्या माध्यमातून परिसरातील आर्थिक हालचालींनाही चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे 'बिग बॉस मराठी' सीझन ६ ची विजेती तन्वी कोलते हिची उपस्थिती. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी दिवा शीळ रोडवरील 'चंद्रागण रेसिडेन्सी' येथे हा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान, उद्घाटन कार्यक्रम जल्लोषात पण उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू असून, स्थानिक नागरिक, व्यापारी आणि तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नव्या पिढीच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे दिव्यातील खाद्यसंस्कृतीला नवे रूप मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे
