अनैयाचा अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया १७ किमी पोहून विक्रम


डोंबिवली \ शंकर जाधव : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ठाकुर्ली येथील ९ वर्षांची अनैया कुंती जगदीश कारकर हिने समुद्रात तब्बल १७ किमी अंतर पोहून अभूतपूर्व पराक्रम गाजवला आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (अटल सेतू) ते गेटवे ऑफ इंडिया हा प्रवास पूर्ण करत तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.


बालाजी आंगण कॉम्प्लेक्स, शिवम बिल्डिंग येथे राहणारी अनैया ओमकार इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असून तिला समुद्रात पोहण्याची विशेष आवड आहे. या आव्हानासाठी तिने चार वेळा समुद्रात सराव केला होता.



१ मे रोजी पहाटे २:२८ वाजता, अंगाला ग्रीस लावून महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली अनैयाने अटल सेतू येथे समुद्राची पूजा करून पोहण्यास सुरुवात केली. सुरुवातीला अंधारामुळे दृश्यता कमी होती. सुमारे एका तासानंतर हवामानात बदल होऊन मोठ्या लाटा उसळू लागल्या. गॉगलमध्ये पाणी जात असतानाही तिने धैर्य न सोडता पोहणे सुरू ठेवले.

समुद्रातील प्रदूषण, मोठ्या बोटी व जहाजांच्या हालचालींमुळे निर्माण होणाऱ्या लाटांचा सामना करत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अनैयाने गेटवे ऑफ इंडिया येथे यशस्वीरित्या पोहोचत विक्रम नोंदवला. हे अंतर पूर्ण करण्यासाठी तिला ३ तास ५२ मिनिटे ३० सेकंद वेळ लागला.



या यशानंतर उपस्थित नागरिक, नातेवाईक तसेच आई-वडील, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराने तिचे जल्लोषात स्वागत केले. प्रशिक्षक विलास माने, रवी नवले आणि संतोष सर यांनीही तिचे विशेष कौतुक केले. अनैया डोंबिवली येथील यश जिमखाना स्विमिंग पूलमध्ये नियमित सराव करते. प्रशिक्षक विलास माने आणि रवी नवले यांच्या मार्गदर्शनाखाली ती दररोज सुमारे ३ ते ३.३० तास सराव करत होती. या यशाबद्दल यश जिमखानाचे मालक राजू वडनेरकर तसेच संपूर्ण स्टाफने तिचे अभिनंदन केले.


आता अनैयाचे पुढील लक्ष्य धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे सुमारे ३६ किमी अंतर पोहून पार करण्याचे असून, तिच्या या ध्येयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post