- एकूण 22 ठिकाणी पार्किंगची
व्यवस्था
- 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी 260 बसची व्यवस्था
- 5 सुसज्ज रुग्णवाहिका व 15 इतर रुग्णवाहिकांची व्यवस्था
- बदल 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत
पुणे : कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभावर अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायी येत असतात. त्यामुळे परिसरात वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत असते. त्यामुळे प्रशासनाने अनुयायांची अडचण होऊ नये म्हणून वाहतुकीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शनिवारी (३१ डिसेंबर) सायंकाळी पाच वाजल्यापासून वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. एक जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाहतूक बदल लागू राहणार आहे. अभिवादन सोहळ्यासाठी येणाऱ्या वाहनांना पेरणे फाटा परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी केले आहे.
अनुयायांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकूण 22 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जयस्तंभ येथे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी 260 बसची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान या कार्यक्रमानिमित्त वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. हा बदल 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत असणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येत असून 5 सुसज्ज रुग्णवाहिका व 15 इतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खाजगी दवाखान्यात 10 टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.
वाहतूक बदल पुढीलप्रमाणे- पुण्याहून नगरकडे जाणारी जड वाहने खराडी बाह्यवळण मार्ग चौकातून हडपसर मार्गे वळविण्यात येणार. खराडी भागताील वाहने पुणे- सोलापूर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे, न्हावरा, शिरूर, नगर रस्ता अशी जाणार आहेत. शिक्रापूर ते चाकण या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. नगरहून पुणे- मुंबईकडे येणारी जड वाहने शिरुर, न्हावरे फाटा, न्हावरे, पारगाव, चौफुला, यवत, सोलापूर रस्तामार्गे पुण्याकडे येतील. मुंबईहूनन नगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक करणारी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटामार्गे नगरकडे जातील. मोटार, जीप अशी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरूरमार्गे नगरकडे जातील.
मोटार लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे-आपले घर शेजारी हनुमंत कंद यांची मोकळी जागा, सातव यांची मोकळी जागा, आपले घर शेजारील मोकळी जागा, लोणीकंद बौद्ध वस्ती शेजारी सागर गायकवाड यांची मोकळी जागा, तुळापूर फाटा स्टफ कंपनी शेजारील मोकळी जागा, सोमवंशी ॲकडमी समोर, खंडोबाचा माळ, तुळापूर रस्ता वाय पॉईन्ट, फुलगाव सैनिकी शाळा मैदान
दुचाकी लावण्याची ठिकाणे पुढीलप्रमाणे- तुळापूर फाटा, संगमेश्वर हॉटेल मागे, टाटा मोटर्स शोरूम मोकळे मैदान, शेजारील मैदान, पेरणे पोलिस चौकीमागील मोकळे मैदान, ज्योतिबा पार्क गोशाळेजवळील मोकळी जागा येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
