मुदतबाह्य औषध पुरवठा प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचे निर्देश


संबंधित संस्थेविरुद्ध तात्काळ कारवाई करण्याचे आदेश 

मुंबई : विनापरवानगी व मुदतबाह्य औषधांचा पुरवठा करून रुग्णांच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी संबंधित संस्थेविरुद्ध तातडीने गुन्हा नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मंत्रालयातील दालनात आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


काही दिवसांपूर्वी पंडित भीमसेन जोशी रुग्णालय येथे भेट दिली असता, एका खोलीत ‘सक्षम फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेकडून पुरविण्यात आलेल्या औषधांचा मोठा साठा आढळून आला. प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या संस्थेकडून तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांची, अवघ्या ४८ तासांत मुदत संपणारी औषधे रुग्णालयाला पुरविण्यात आली होती. विशेष म्हणजे, अशा औषधांची कोणतीही मागणी रुग्णालय प्रशासनाने केलेली नव्हती.


ही औषधे रुग्णांना दिली गेली असती, तर गंभीर आरोग्यधोके निर्माण होण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर संबंधित प्रकार अत्यंत गंभीर मानून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


गोरगरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्यांविरुद्ध कोणतीही सहनशीलता दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला. संबंधित तथाकथित स्वयंसेवी संस्थेविरुद्ध तातडीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post