- आंबिवली, दिवा, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवलीतील रहिवाशीची कल्याण येथील सहायक मंडल अभियंता कार्यालयासमोर रांगा
डोंबिवली : डोंबिवलीतील इंदिरानगर, त्रिमूर्तीनगर, राजीवनगर, शिवशंकर आणि गौरीशंकरवाडी येथील रेल्वेच्या जमिनीवर अनेक वर्षांपासून लोकांची वस्ती आहे. ही रेल्वेची जमीन असल्याने येथील रहीवाशांना रेल्वे प्रशासनाने आधीही नोटीसा बजावल्या होत्या त्यांनतर २८ तारखेला कल्याण येथील सहायक मंडल अभियंता कार्यालयात रहिवाशांनी कागदपत्रे जमा केली.
रेल्वेच्या जमिनीवर वस्ती केलेल्या हजारो रहिवाशांनी आपली कागदपत्रे जमा करा अशा नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यावेळी आंबिवली, दिवा, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवलीतील अनेकांना रेल्वे प्रशासनाकडून नोटीसा बजावल्या होत्या.या दिवशी सुनावणी होणार होती अशी माहिती रहीवाशांना देण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून कागदपत्र जमा करून पुढील माहिती कळविण्यात येईल असे सांगण्यात आले. मात्र रेल्वेच्या जमिनीवर वस्ती केलेल्या हजारो रहिवाशांना बेघर करून विकास करता येणार नाही, त्यांचे पुर्नवसन करा अशी मागणी खासदार, लोकप्रतिनिधी,आमदार यांच्याकडून करण्यात आली होती. तरीही आपल्या घरावर टांगती तलवार असल्याची भीती येथील रहिवाश्यांना आहे.एकीकडे सरकार आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही आणि दुसरीकडे रेल्वे प्रशासनाकडून पाठविण्यात आलेली नोटीस यामुळे आपल्या न्याय मिळेल का ? याची चिंता लागली आहे.
२८ तारखेला सकाळी अंबरनाथ, दिवा, ठाणे, भिवंडी आणि डोंबिवलीतील अनेक रहिवाशी कल्याण येथील सहायक मंडल अभियंता कार्यालयासमोर रांगा लागून होते. वीज बिल, प्रशासनाकडून करण्यात आलेला पुर्नवसनची सर्वे पावती, आधारकार्ड, पॅन कार्ड आदि कागदपत्र रेल्वेच्या संबधित अधिकाऱ्यांना देण्यात आली.रेल्वेच्या पुढील भूमिकेबाबत विचारणा केली असता आज फक्त कागदपत्र जमा करण्याचे काम आहे, पुढील भुमिकेबाबत माहिती दिली जाईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी रहिवाशांना सांगितले.
