आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलनाचा मनसेचा सहाय्यक आयुक्तांना इशारा
दिवा /आरती मुळीक परब : दिव्यातील बि. आर.नगर विभागातील समाधान नगर परिसरातील रहिवाशांना कित्येक दिवसांपासून पाणी पुरवठा होत नव्हता. अधिकृतपणे पाण्याची बिलं भरून सुद्धा रहिवाशांना पाणी मिळत नसल्याने रहिवाशांनी दिवा प्रभाग समितीकडे पत्रव्यवहार करून नव्याने नळ जोडण्या देण्याची मागणी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना केली होती. पण गेले २ महिने सतत पाठपुरावा करूनही ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीही ठोस दखल न घेता फक्त आश्वासन देण्यात येत होती.
अखेर येथील रहिवाशांनी मनसेच्या महिला शाखाध्यक्ष निकिता सालप यांच्याशी संपर्क साधून आपली कैफियत मांडली. त्यांनतर मनसे शहर अध्यक्ष तुषार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्तांची भेट घेऊन रहिवाशांच्या तक्रारीची दखल न घेतल्याबद्दल जाब विचारला, तसेच पुढील दोन दिवसात सर्व रहिवाशांना नवीन जोडण्या देऊन त्यांचा पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास महापालिका आयुक्तांच्या दालनासमोर दिवा मनसे रहिवाशांना घेऊन ठिय्या आंदोलन करेल असा त्यांनी इशारा दिला.
यावेळी दिवा मनसेचे शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील, उपविभाग अध्यक्ष शैलेंद्र कदम, ऋषिकेश भगत आणि महिला शाखाध्यक्ष निकिता सालप हे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार राजु पाटील यांनी आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली होती, तेव्हा आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले होते की, पाणी, स्वच्छता आणि शौचालय या विषयात कोणाताच हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. नागरिकांना काम धंदा नाही म्हणून ते आपल्या कार्यालयात येत नसतात, खरच पाणी मिळत नाही म्हणून ते येत असतात. पण दिवा प्रभात समिती मधील अधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या ह्या निर्देशांना केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. २ महिन्यांपूर्वी आमदार राजु पाटील यांचा दिवा दौरा सुरू असताना समाधान नगर मधील नागरिक आपली समस्या घेऊन आले होते, तेव्हा सहा. आयुक्त शेख तसेच वाघेरे यांनी तात्पुरते टँकर ची व्यवस्था करून लवकरच त्यांची समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले होते. पण त्यातील कोणतीच मागणी पूर्ण होत नसल्याने आमच्या शाखा अध्यक्षा निकिता सालप समाधान नगरातील महिलांना घेऊन दिवा प्रभाग समिती कार्यालयात गेल्या. पण तिथे पाणी खात्यातील एकही अधिकारी उपस्थित नसून कोणीच फोन कॉल ही उचलत नव्हते. शेवटी महिलांचा सहनशक्तीचा बांध तुटला व सहा.आयुक्त यांच्या दालनात दिवा शहर सचिव प्रशांत गावडे, विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील, विभाग सचिव परेश पाटील, विभाग उपाध्यक्ष ऋषिकेश भगत यांच्या समवेत इशारा दिला की 2 महिने निघून गेले आता शेवटचे 2 दिवस तुम्हाला वेळ देण्यात येत आहे. सदर पाण्याची समस्या न सोडवल्यास ठा.म.पा. आयुक्त यांच्या दालनात जाऊन ठिय्या आंदोलन करणार.
तुषार पाटील, मनसे दिवा शहर अध्यक्ष