दिवा \ आरती परब : दिवा परिसरातील पालिकेची व्यायामशाळा दीर्घकाळापासून मोडकळीस आलेली होती. पालिकेच्या दुर्लक्षामुळे तिची अवस्था दिवसें दिवस दयनीय होत गेली आणि अखेरीस ही व्यायामशाळा जोरदार पावसामुळे संपूर्ण कोसळली.
या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे दिवा- शिळ मंडळाचे व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर यांनी ठाणे महानगरपालिकेला २०२१ ला निवेदन दिले होते. या व्यायामशाळेमुळे स्थानिक नागरिक आणि तरुणांना मोठा फायदा होत होता, परंतु जीर्ण अवस्थेमुळे वापरणे धोकादायक ठरत होते. या व्यायामशाळेत एकाच वेळी वीस तरुण व्यायाम करु शकतील एव्हढी ती मोठी होती. पण त्याची पडझड सुरु होताच तरुणांनी व्यायाम करणे बंद केले. ही व्यायामशाळा अंदाजे पंधरा वीस वर्षे जुनी असल्याचे भोईर यांचे म्हणणे आहे.
भाईर यांनी निवेदनात पालिकेला तातडीने कारवाई करून मोडकळीस आलेल्या व्यायामशाळेचे अवशेष हटवून त्याच ठिकाणी नवीन आणि सुसज्ज व्यायामशाळा बांधण्याची मागणी केली होती. पण त्याकडे ही पालिकेने जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याने अखेल काल ती व्यायामशाळा कोसळली.
पालिकेच्या दुर्लक्षामुळे झालेल्या या पडझडीवर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, नवीन व्यायामशाळेचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पुन्हा ती नविन व्यायामशाळा झाल्यास स्थानिक युवकांना क्रीडा आणि व्यायामासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होईल असे भोईर यांनी सांगितले.