दिवाकरांचा डंम्पिंगवर विजय

 

भंडार्लीचा कचरा प्रकल्प सुरू झाल्याने दिवेकरांचा श्वास होणार मोकळा

दिवा / आरती मुळीक परब :  डंम्पिंगच्या प्रदूषित धुराच्या कोंडमाऱ्यामुळे मेटाकुटीला आलेली जनता १ फेब्रुवारीपासून मोकळा श्वास घेणार आहे. ठाणे महानगरपालिकेकडून दिव्यात टाकण्यात येणारा ओला आणि सुका कचरा आता भंडार्ली कचरा प्रकल्पाकडे आजपासून वळविण्यात येणार आहे. यामुळे दिव्यातील नागरिकांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

गेली कित्येक वर्षे दिवेकर डंम्पिंगच्या धुरात गुदमरत होते. दिव्यातील विकासाला, शहराच्या प्रगतीला सर्वात मोठा अडथळा हा दिवा डंम्पिंग होता. या डंम्पिंग प्रकल्पातून येणारा उग्र वासामुळे येथील लोकांना श्वसनाचे विकार, डोळ्यांचे विकार, त्वचेचे विकार आणि पोटाच्या आजार झाले होते. त्यामुळे नागरिकांच्या शरीरावर मोठा आघात होत होता. यामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले होते. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे लोकांनी घरे विकून पलायन केले होते. यातून निघणारा धूर संपूर्ण दिवा, मुंब्रा शहरात पसरायचा. यामुळे लोकं वारंवार हैराण व्हायची.

हा प्रकल्प बंद करावा यासाठी येथील नागरिक, राजकीय संघटना, सामाजिक संघटना या वेळोवेळी प्रयत्न करीत होत्या. प्रसंगी दिवा डंम्पिंग ग्राऊंड बंद व्हावा यासाठी लोकांना अनेक न्यायालयीन चकराही माराव्या लागल्या होत्या. आंदोलनाच्या माध्यमातून काही पक्षाच्या कार्यकर्त्यांना अटकही झाली होती. त्यामुळे या सर्व नागरिकांच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून येत आहे.

माजी महापौर नरेश म्हस्के यांनी दिलेला शब्द पाळला

दिवा डंम्पिंग बंद होईल याची दिवेकर नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते. परंतु नुकत्याच झालेल्या दिवा महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या दिवशी हजेरी लावलेले ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी नागरीकांना भर कार्यक्रमात दिवा डंम्पिंग जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत बंद होईल असे सांगितले होते. त्यामुळे आज जानेवारीच्या 31 तारखेलाच दिवा डंम्पिंग बंद करण्यात आल्याने महापौरांनी दिलेला शब्द पाळल्याची प्रचिती आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post