पुणे : वर्षाच्या सुरूवातीपासून राज्यात थंडीचा जोर वाढल्याचे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पहायला मिळाले. मात्र हा जोर पुढच्या पाच दिवसांत कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील तापमान 2 ते 3 अंशांनी उतरणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
मुंबईसह कोकण, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, औरंगाबाद जिल्ह्यांत कडाक्याची थंडी जाणवत होती. दरम्यान ही थंडी कमी होण्यासाठी आणखी पाच दिवसांचा कालावधी लागणार आहे. राज्यातील काही भागात दिवसभर 30 अंशांच्या पुढे तापमान असते तर रात्री अचानक थंडी पडत असल्यामुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात जाणवू लागल्या आहेत. दरम्यान 19 ते 26 जानेवारीपर्यंत याचा परिणाम उत्तर भारतात जाणवण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
