ठाणे पोस्टल डिव्हिजन मार्फत 9 आणि 10 फेब्रुवारी रोजी
ठाणे : आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत संपूर्ण देशभरात 9 आणि 10 फेब्रुवारी 2023 या दोन दिवसांत सुकन्या समृद्धी खाते उघडण्याची मोहीम राबविण्यात येणार आहे. ठाणे पोस्टल डिव्हिजन मार्फत देखील वरील दोन दिवशी सुकन्या खाते उघडण्याचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तरी पालकांनी 9 आणि 10 फेब्रुवारी ह्या दोन दिवसांत नजीकच्या पोस्ट ऑफिसला भेट देऊन सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ घेऊन आपल्या सुकन्येचे भविष्य सुरक्षित करावे अशी सर्वांना विनंती करण्यात येत आहे.
सुकन्या समृद्धी योजना ही दहा वर्षे वयाच्या आतील मुलींच्या उज्वल आणि सुरक्षित भविष्यासाठी, भारत सरकारने राबवलेली बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी हि योजना `बेटी बचाओ बेटी पढाओ' मोहिमेचा एक भाग म्हणून सुरू करण्यात आली आहे. केवळ रुपये 250 भरून हे खाते पोस्ट ऑफिस मध्ये उघडता येते आणि खात्याची परिपक्वता खाते उघडल्यापासून 21 वर्षांनी होते. खातेदार प्रत्येक वर्षी किमान रु. 250 आणि कमाल रु. 1,50,000 इतके ह्या खात्यात जमा करू शकतात. आणि मुलीच्या 18 व्या वर्षी तिच्या शिक्षणासाठी जमा रकमेच्या अर्धी रक्कम काढता येऊ शकते. ह्या योजनेचा व्याज दर सध्या 7.6 टक्के इतका आकर्षक आहे.