भारतीय महिलांची विश्वचषकाला गवसणी

 


  • पहिल्या अंडर-19 वूमन्स टी-ट्वेंटी विविश्वचषकाचे जेतेपद 
  • इंग्लंडला 7 विकेट्सने हरवले 

नवी दिल्ली:  दक्षिण आफ्रिकेच्या पोशेफस्ट्रूमच्या सिवन्स पार्क स्टेडियमवर पार पडलेल्या पहिल्या वहिल्या अंडर-19 वूमन्स टी-20 विश्वचषक स्पर्धेवर भारताने आपले नाव कोरले आहे. भारतीय संघाने इंग्लंडला 7 विकेट्सने हरवून जेतेपद पटकाविले.

    भारताची कर्णधार शफाली वर्मा हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी सार्थ ठरवून इंग्लंडला सुरुवातीपासूनच जोरदार धक्के दिले. इंग्लंडचा संघ निर्धारित 20 षटकेही पूर्णपणे खेळून काढू शकला नाही. अखेरीस त्यांना 17.1 षटकांत केवळ 68 धावांपर्यंतच मजल मारता आली. इंग्लंडकडून केवळ चार फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज रियाना मॅकडोनाल्ड हिने 24 चेंडूंत सर्वाधिक 19 धावा केल्या. तिला पार्श्वी चोप्राने बाद केले. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाचे दोन्ही सलामी फलंदाज स्वस्तातच माघारी परतले होते. मात्र सौम्या तिवारी (नाबाद 24) आणि गोंगदी त्रिशा (24 धावा) यांनी संघाला अडचणीत येण्यापासून वाचवले.   

     भारताकडून कर्णधार शफाली वर्माने 15 तर श्वेता सहरावतने पाच धावा बनवल्या. भारताच्या पहिल्या दोन विकेट गेल्या तेव्हा स्कोअर 20 धावा होता. पण त्यानंतर त्रिशा आणि सौम्या यांनी 46 धावांची भागिदारी केली. भारतीय संघाने निर्धारित लक्ष्य 3 विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 14 षटकांत पार केले. पहिल्याच अंडर-19 विश्वचषकमध्ये भारतीय संघाने केलेल्या या कामगिरीचं सोशल मीडियावर जोरदार कौतुक होताना दिसत आहे. 

भारताच्या युवा महिला क्रिकेटपटूंनी अतिशय उत्कृष्ट खेळ करत विश्वचषक पटकाविला. गेल्या काही वर्षात सर्वच क्रीडा प्रकारात आपले युवा खेळाडू उच्च दर्जाच्या खेळाचे प्रदर्शन करत असून आगामी काळात भारत क्रीडाविश्वात आणखी नाव कमावेल. युवा महिला क्रिकेटपटूंचे मन:पूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

 देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री



Post a Comment

Previous Post Next Post