मुंबई: कोकणातील पर्यटनाला चालना देण्याचा निर्णय सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आला. कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला त्याअंतर्गत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाचे देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील एकूण ३७ रेल्वे स्थानकांच्या देखभाल व दुरुस्तीचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित होते.
कोकणातील पर्यटन स्थळे देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामे गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्या अर्थाने लवकरच फायदा होईल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
Tags
महाराष्ट्र
