चार गंभीर जखमी
पेण : पेण-खोपोली मार्गावर वाक्रुळ येथे रविवारी सायंकाळी ट्रक आणि इको कारची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व मयत आणि जखमी हे कोल्हापूरला बाळुमामाच्या यात्रेसाठी इको कारने जात होते.
इको कारमधून दिंडे परिवार भाविक बाळूमामाच्या यात्रेसाठी कोल्हापूरच्या दिशेकडे चालले होते. पेण पूर्व विभागातील वाक्रुळ गावाजवळ ट्रक आणि इको कार यांच्यात जोरदार धडक झाली. यामध्ये इको कारमधील चालक नागेश विक्रम दिंडे (वय-२७), प्राजक्ता नागेश दिंडे (वय-२५) आणि विक्रम गोविंदराव दिंडे (वय-५०) हे जागीच ठार झाले. तर याच कारमधील गजानन चंदन वडगावकर (वय-१३), विकी विठ्ठल श्रीरामे (वय-१५), मीनाक्षी विक्रम दिंडे ( वय-२२), कविता विक्रम दिंडे (वय-४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच वाक्रुळ येथे राहणारे माजी आमदार धैर्यशील पाटील आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. परिसरातील ग्रामस्थांनी आणि स्थानिक युवकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तर कल्पेश ठाकूर यांनी स्वतःच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पेणमधील सरकारी रुग्णालय, म्हात्रे रुग्णालय आणि नंतर कामोठेतील एमजीएम रुग्णालयात तातडीने दाखल केले. कल्पेश यांनी क्षणाचाही विलंब न लावता जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याने जखमींचे प्राण वाचविण्यात यश आले.
सदर अपघाताची नोंद पेण पोलीस स्थानकात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ करीत आहेत.