दिवा : दिवा चौक येथे रात्रंदिवस उघड्यावर आणि टोळीने दारू पिणारे तळीराम आता दिवा पोलिसांच्या रडावर असून गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. याबाबत दिवा पोलिस चौकीचे सहाय्यक पोलिस निरिक्षक शहाजी शेळके यांनी कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
दिवा चौका शेजारीच दिवा महोत्सवाचे प्रसिद्ध मैदान आहे. या मैदानातूनच दिव्याच्या सांस्कृतिक पायाभरणीला सुरवात झालेली आहे. या ठिकाणी दरवर्षी नागरिक जमा होऊन दिव्यातील नागरिक परिवासासह येऊन आनंदोत्सव साजरा करतात. मात्र या मैदानात तळीराम थेट टोळीने दारू पिण्यास बसून मैदानात बाटल्या, पेपर आणि पिशव्या टाकतात. काही बाटल्या फुटल्यामुळे नागरिकांच्या पायांनाही इजा झाल्याचे समजत आहे. त्यामुळे सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या या मैदानातून तळीरामांवर कडक कारवाई करावी अशी ओरड नागरिकांची सुरू होती.
सदर ठिकाणी महिलांवर एखाद्या दारुड्यांची नजर पडल्यास त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. तसेच रात्री 8 नंतर येथून महिला प्रवास करण्यासही घाबरत असतात. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रकरणी दिवा पोलिसांनी कडक कारवाई करण्यास सुरवात केली आहे.