- 28 किमीच्या मार्गासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद
- रेल्वे प्रकल्प २०२५ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा
मुरबाड: कल्याण-मुरबाड रेल्वेचा समावेश `गतीशक्ती'त करण्यात आला असून रेल्वे अर्थसंकल्पात कल्याण ते मुरबाड व्हाया उल्हासनगर 28 किमीच्या रेल्वे मार्गासाठी 100 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा रेल्वे प्रकल्प २०२५ पर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला यंदा 2023-24 च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी 13,539 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. कल्याण ते मुरबाड रेल्वे मार्ग गेली पन्नास वर्षे रखडला होता. या ठिकाणी मल्टी मॉडेल इंडस्ट्रियल कॉरिडॉर उभारण्याची रेल्वेची भूमिका आहे. त्यामुळे मुरबाड तालुक्याला वैभव प्राप्त होऊन, हजारो रोजगार मिळणार आहे. या प्रकल्पाबाबत जमीन अधीग्रहणासाठीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. याबाबत जमीन अधीग्रहणाबाबत रेल्वे बोर्डाने शुक्रवारीच मध्य रेल्वेला पत्र दिले आहे. मध्य रेल्वेने जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्यानंतर जमीन अधीग्रहणासाठी अधिकारी नियुक्ती होईल. तर आठवडाभरात जमीन अधिग्रहण सुरू होईल. भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठजी यांच्या मूळ मुरबाड गावात १७० वर्षाने रेल्वे पोचणार आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी अनेकदा सरकार दरबारी मागणी करूनही रेल्वेसेवा कागदावरूनही पुढे सरकली नव्हती. कल्याण- मुरबाड रेल्वे मार्गाला साल 2016 मध्ये तत्वत: मंजूरी दिली होती. या मार्गामुळे कल्याण तालुक्यातील अनेक गावेही जोडली जाणार आहे. साल 2009-14 दरम्यान महाराष्ट्राला दरवर्षी देण्यात आलेल्या सरासरी 1171 कोटी रुपयांच्या तुलनेत ही रक्कम जवळपास 11 पट अधिक असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गावरील स्थानकेकल्याण, शहाड, आंबिवली, कांबा, आपटी, मामनोली, पोटगाव आणि मुरबाड अशी आठ स्थानके आहेत. या मार्गात दोन मोठे पुल, २२ छोटे पूल, ७ आरओबी, १२ अंडरपास मार्गांचा समावेश आहे.