मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
ठाणे : एमसीएचआय – क्रेडाई, ठाणे, ठाणे इस्टेट एजंट असोसिएशन यांच्या वतीने ठाण्यातील रेमंड मैदानावर आयोजित गृहबांधणी प्रकल्पांच्या (प्रॉपर्टी) प्रदर्शनास आज मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, गृहनिर्माण व्यवसायात मोठ्या प्रमाणावर तरुण येत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. या क्षेत्रात एकमेकांच्या सहकार्याची गरज लागणार असून राज्य शासन या व्यवसायासाठी सर्वतोपरी सहाय्य करेल. कोविड काळात या क्षेत्राने राज्य शासनाला खूप सहकार्य केले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने एकात्मिक सर्वसमावेशक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (युनिफाइड डिसीआर) तयार केली. या नियमावलीमुळे बांधकाम व्यवसायाला गती मिळाली आहे. अनेक प्रकल्प सुरु होण्यास मदत झाली आहे. त्यामुळे या नियमावलीचा लाभ सर्वसामान्यांनाही व्हायला हवा. त्यासोबतच कोरोना काळात बांधकाम क्षेत्राला बसलेल्या फटक्यातून हे क्षेत्र सावरण्यासाठी स्टॅम्प ड्यूटी आणि प्रीमीयम मधून सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्याचाही मोठा फायदा बांधकाम व्यावसायिक आणि त्यानंतर थेट ग्राहकाला मिळाला आहे.
सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणारे बांधकाम क्षेत्र असून या व्यवसायावर अडीचशेहून अधिक व्यवसाय अवलंबून आहेत. त्यामुळे या क्षेत्राला सर्व सवलती देण्याचे काम राज्य शासनामार्फत केले आहे.
प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. येत्या दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार आहोत. त्याचप्रमाणे ठाण्यातील रस्तेही खड्डेमुक्त करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ठाणे एमसीएचआयने ग्लोबल कोविड हॉस्पिटल व इतर रुग्णालय उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केले. ज्या शहरात आपण व्यवसाय करतो, काम करतो त्या शहरासाठी काहीतरी देणे लागतो या भावनेतून एमसीएचआयने काम केले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू आहेत. पायाभूत सुविधांचा लाभ गृहनिर्माण क्षेत्राला होणार आहे. रस्ते चांगले असतील, तर त्या क्षेत्राचा विकास होतो. त्यामुळे आम्ही हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने केले. या महामार्गामुळे प्रवासाचा वेळ वाचला असून प्रदूषणही कमी होण्यास मदत होत आहे. या प्रमाणेच मुंबई महानगर परिसरातही वसई विरार मल्टिमॉडल कॉरिडॉर, ठाणे ते बोरिवली टनेल मार्ग, शिवडी न्हावाशेवा एमटीएचएल मार्ग असे अनेक प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या 357 किलोमीटरच्या मेट्रोच्या जाळ्यामुळे ठाणे, नवी मुंबई, मुंबई हा महानगर प्रदेशाचा भाग जवळ आला असून प्रवासाचा वेळ वाचला आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रताप सरनाईक, क्रेडाई एमसीएचआय ठाण्याचे अध्यक्ष जितेंद्र मेहता, दीपक गरोडिया, राजू व्होरा, बांधकाम व्यावसायिक व राज्य शासनाच्या मैत्री समितीचे उपाध्यक्ष अजय अशर, रेमंडचे संदीप माहेश्वरी, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आदी उपस्थित होते. प्रदर्शनानिमित्त आयोजित डेस्टिनेशन ठाणे परिसंवादाचे उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते यावेळी झाले.