- भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता
- ठाणे महानगरपालिकेने मांडलाय नागरिकांच्या जीवाशी खेळ
दिवा/ आरती मुळीक परब : ठाणे जिल्ह्यातील अनेक शहरात कळवा, मुंब्रा, दिवा येथे अनधिकृत इमारतींवर मोबाईल टॉवर असून एक प्रकारे ठाणे महानगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळते आहे असे दिसून येते. दिव्यातील अनेक अनधिकृत इमारतीवर मोबाईल टॉवर असून त्यातून बाहेर पडणाऱ्या रेडिएक्षण मुळे त्रास होऊन अनेकांना मोठमोठ्या आजारांना समोरे जावे लागत आहे, यात मोठ्या मोबाईल कंपन्यांनी दिव्यात घुसखोरी केली असून, अवैधपणे बांधकाम व्यवसायिकांना पैशाचे आमिश दाखवून अनेक अनधिकृत इमारतींवर अवैध मोबाईल टॉवर उभारत असल्याचे दिसून येते. प्रत्येक दहा इमारती मागे 3 ते 4 इमारतींवर मोबाईल टॉवर बसवले जात असून यावर अद्याप कोणतीच कारवाई होत नाही. सुमारे २०० फूट उंचीच्या मोबाइल टॉवरमधून निघणाऱ्या रेडिओ लहरी (विद्युत चुंबकीय) या जमिनीशी समांतर जात असल्या तरी त्या काँक्रीट भिंतीनाही भेदून आरपार जाणाऱ्या असल्यामुळे कालांतराने अनेक रोग व व्याधींना जन्म देतात.मोबाइल टॉवर लावताना केलेल्या ड्रिलिंगमुळे इमारत खिळखिळी होते ते वेगळेच. अशा कमकुवत झालेल्या वा जुन्या इमारतींवर बसविलेले हे टॉवर्स अतिवृष्टी, वादळे व भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्तीत अधिक विनाशाला कारणीभूत होतात. चुकीची वीजजोडणी झाल्यास शॉटसर्किटमुळे आग लागण्याचा धोकाही संभवतो. टॉवरला व त्या वातानुकूलनासाठी भारनियमन असलेल्या भागात लावलेल्या विद्युत जनित्रामुळे (Generator) शहरात आधीच असलेल्या प्रदूषणामध्ये भर पडते ती निराळीच महत्वाची गोष्ट म्हणजे दिव्यातील जवळ जवळ बहुत्येक इमारती ह्या अनधिकृत असून कामाचा दर्जा देखील कमकुवत आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्याचे भरमसाठ लोड असलेले हे टॉवर इमारतीवर उभारत आहेत. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे अनेक सुशिक्षित नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिव्यातील अवैध मोबाईल टॉवरवर कठोर कारवाई करून हटवण्यात यावे व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेने पावले उचलावीत असे युवा वर्ग, पर्यावरण प्रेमी, समाजसेवक व ज्येष्ठ नागरिकांनी मत व्यक्त केले आहे.