डोंबिवली / शंकर जाधव : प्रतिभा कला प्रतिष्ठानच्या वतीने डोंबिवली पूर्वेकडील सर्वेश सभागृहात चैतन्य आणि युवारत्न पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला. स्व. उषाताई करमरकर ह्यांच्या सामाजिक, कला आणि क्रीडा क्षेत्रातील योगदानाची आठवण म्हणून त्यांच्या नावाने चैतन्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्या वर्षी संस्कार भारतीचे विद्यमान प्रांत सदस्य, कला आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे संजय गोडसे , डोंबिवली मधील नाट्यक्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या दिपाली काळे ह्यांना प्रदान करण्यात आला.
दुसरा पुरस्कार हा अतिशय आधुनिक विचारसरणीने आपलं जीवन व्यतीत करणाऱ्या आणि अतिशय चिरतरुण मनाने कलेचा ध्यास शेवटच्या श्वासापर्यंत घेणाऱ्या प्रमिला कोल्हटकर ह्यांच्या नावाने युवारत्न पुरस्कार देण्यात येतो. कथक विशारद आणि रांगोळी-चित्रकार उमेश पांचाळ आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त सुनील सूनकरा हे युवारत्न पुरस्काराचे मानकरी होते. संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री रविंद्रजी बेडेकर हे ह्या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आपल्या दोन्ही आजींच्या नावाने हा पुरस्कार प्रदान करणाऱ्या प्रतिष्ठानच्या अध्यक्षा , प्रसिद्ध कथक नृत्यांगना डॉ.वृषाली दाबके ह्यांनी ह्या पुरस्कारामागची संकल्पना सांगितली. दोन्ही आजींनी दिलेला कलेचा आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेत असताना त्याच मार्गावर चालणारे युवा कलाकार आणि समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची निवड करण्यात येत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ह्या सोहळ्याची सुरुवात श्री मुद्रा कला निकेतनच्या विद्यार्थिनींनी कथक नृत्याने केली. युवारत्न पुरस्कार विजेत्या उमेश पांचाळ आणि सुनील सुनकरा ह्यांनी कथक नृत्य सादर केले तसेच सुनील ह्यांच्या नृत्यावर उमेश पांचाळ ह्यांनी एक चित्र त्याचवेळी काढून सर्वांची वाहवा मिळवली. प्रमुख पाहुणे रविंद्रजी बेडेकर ह्यांनी एक आदर्श कार्यकर्ता कसा असावा आणि समाजाच्या विकासासाठी आपण कार्यकर्त्याच्या भूमिकेत असणं किती गरजेचं आहे याचे महत्त्व सांगत सर्व पुरस्कार विजेत्यांचे कौतुक केले. ह्या सोहळ्यासाठी डोंबिवलीतील माधव जोशी, चंद्रशेखर टिळक, श्रीकांत पावगी, मीना गोडखिंडी, रवींद्र फडणीस, विजय काळे, राजन जोशी, स्मिता मोरे, अलकाताई मुतालिक असे अनेक मान्यवर उपस्थित होते.