वसूली कार्यक्षमता १०३ टक्के घरात पोहचवणे हेच मेहनतीचे परिपाक

 


 सहव्यवस्थापकीय संचालक डांगे यांचे प्रतिपादन

कल्याण / शंकर जाधव : नकारात्मक परिस्थितीचा यशस्वीपणे सामना करत सर्वच घटकांनी केलेल्या कठोर परिश्रमातून कल्याण परिमंडलाला राज्यात अव्वल स्थान गाठता आले. वसूली कार्यक्षमतेत आघाडी, वीज गळतीत घट, कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांकडून थकबाकी वसूली तसेच इतर निकषांमध्ये कल्याण परिमंडलाने मोलाची कामगिरी बजावली. वसूली कार्यक्षमता १०३ टक्क्यांच्या घरात पोहचवणे हे वर्षभर व सातत्याने घेतलेल्या कठोर मेहनतीचा परिपाक आहे. चालू आर्थिक वर्षातही ही कामगिरी उंचावताना नवीन आव्हानांचा वेध घेण्याचे आवाहन कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत डांगे यांनी कल्याण परिमंडलातील अधिकारी, अभियंते, कर्मचारी व जनमित्रांना केले.

गेल्या आर्थिक वर्षातील कामगिरीचा आढावा व चालू आर्थिक वर्षातील आव्हाने यासंदर्भात कल्याण परिमंडलाच्या प्रांगणात मंगळवारी सायंकाळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे आणि राजेशसिंग चव्हाण यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. सहव्यवस्थापकीय संचालक डांगे म्हणाले, वसूली कार्यक्षमता १०३ टक्क्यांच्या घरात पोहचवणे हे वर्षभर व सातत्याने घेतलेल्या कठोर मेहनतीचा परिपाक आहे. त्यामुळेच गतवर्षीच्या तुलनेत यंदा मार्च अखेर परिमंडलाच्या थकबाकीत उल्लेखनीय घट झाल्याचे त्यांनी नमूद केले.

मुख्य अभियंता औंढेकर यांनी गत आर्थिक वर्षातील कामगिरीचा आढावा घेत योगदान देणाऱ्या सर्वांचे कौतूक केले. विशेषत: वीजचोरांविरुद्ध व्यापक व पथदर्शी कारवायांचा त्यांनी गौरव केला. वीज गळती १२ टक्क्यांपर्यंत खाली आणण्याचे आव्हान पेलण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देतानाच तत्पर ग्राहक सेवेत कोठेही कमी पडणार नाही, याची दक्षता बाळगण्याची सूचना त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांना केली.यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, कार्यकारी अभियंता (प्रशासन) अनिल महाजन, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा, निलेश भवर व शशिकांत पोफळीकर, क्षेत्रीय कार्यालयातील सर्व कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, सहायक व कनिष्ठ अभियंते, जनमित्र, कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपकार्यकारी अभियंता स्मीता काळे यांनी केले. तर अधीक्षक अभियंता भोळे यांनी आभार मानले.


  उत्कृष्ट कामगिरीचा गौरव

कल्याण परिमंडलात कल्याण एक आणि दोन, वसई, पालघर असे चार मंडल कार्यालये व त्यांतर्गत ९ विभागीय, ४२ उपविभागीय व १८० शाखा कार्यालये आहेत. गतवर्षीच्या कामगिरीत वसूली कार्यक्षमता व उद्दिष्टपूर्तीच्या निकषांवर कल्याण एक मंडल कार्यालय, डोंबिवली, कल्याण पश्चिम व उल्हासनगर दोन ही तीन विभागीय कार्यालये, प्रत्येक मंडलातील पहिले पाच उपविभागीय कार्यालये व १० शाखा कार्यालयांचा विशेष गौरव करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post