मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीत मित्रांनीच केली मित्राची हत्या

 


दिवा / आरती मुळीक परब : मुंब्रा येथे मित्राच्या वाढदिवसाच्या दारू पार्टीत मित्रांमध्ये झालेल्या वादातून दोन भावंडांनी मिळून एका तरुणाची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेनंतर मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंब्रा पोलिसांनी या दोन भावांना अटक केली आहे. या दोन्ही भावांवर या आधी देखील एक गुन्हा दाखल असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत.

ठाण्यातील मुंब्रा येथील ठाकूर पाडा परिसरात ८ एप्रिल शनिवारी पहाटे १ वाजण्याच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाची दारू पार्टी करण्यासाठी जमले. ७ ते ८ जणांचं टोळकं पार्टी करत मद्यपान करत असताना मित्रांमध्ये शाब्दिक वाद सुरु झाला. यावेळी मद्यधुंद अवस्थेत उदय कदम या तरुणाचा सिद्धेश शेडगे व संकेत शेडगे या दोन भावंडांसोबत कडाक्याचे भांडण सुरु झाले. हे भांडण विकोपाला जाऊन सिद्धेश शेडगे व संकेत शेडगे यांनी स्वतः जवळ असलेले धारदार शस्त्र काढून उदय कदम याच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ला झाल्यानंतर उदय कदम याला मित्रांनी उचलून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. 

या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात या सिद्धेश शेडगे व संकेत शेडगे या दोन्ही भावंडांच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल झाला असून या दोघा भावंडांना पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल करून पोलिसांनी अधिकचा तपास केला असता सिद्धेश शेडगे व संकेत शेडगे या दोघांच्या विरोधात या आधी देखील असाच एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. पुढील तपास मुंब्रा पोलीस करत असल्याचे कळवा मुंब्रा विभागाचे पोलीस उपयुक्त गणेश गावडे यांनी सांगितले.

Tag : दिवा हत्या , मित्रांनी केली हत्या, दिवा पोलीस

Post a Comment

Previous Post Next Post