दिवा : मागील पाच वर्षात ठाण्याचे माजी उपमहापौर हे जरी दिव्यातील असले तरीही दिव्याला स्वतंत्र रुग्णालय होऊ शकले नाही. नवीन इमारत सोडा, परंतु तात्पुरत्या स्वरूपातही दिवावासीयांना रुग्णालय दिले नाही. येथील नागरिकांच्या आरोग्याची काळजी सत्तेत असणाऱ्यांना नव्हती आणि म्हणून दिवा भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्ष ज्योती पाटील यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलच्या मागणीसाठी लक्षवेधी धरणे आंदोलन करत असल्याचे स्पष्टीकरण भाजपचे दिवा अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिले आहे.
दिव्यातील जनता आता माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांना जाब विचारत आहे, हॉस्पिटल का नाही बनवले? जनता यांच्या कारभाराला कंटाळली आहे, असे मुंडे म्हणाले आहेत. दिव्यातील जनतेला आरोग्य सुविधांपासून वंचित ठेवण्याचे काम मागील काही वर्षांपासून झाले आहे.
दिव्यातील नागरिकांसाठी पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय नसल्याने येथील गोरगरीब जनतेला उपचारासाठी डोंबिवली, ठाणे, मुंबई येथील रुग्णालयांवरती अवलंबून राहावे लागते. इमर्जन्सी वेळी येथील नागरिकांना ठाणे, मुंबई येथे जाण्यात अडचणी येतात. वेळेवर ॲम्बुलन्स मिळत नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो. दिव्यात पालिकेचे सार्वजनिक रुग्णालय महापालिका प्रशासनाने तातडीने सुरू करावे, अशी आमची मागणी असून ही मागणी गांभीर्याने न घेतल्यास येणाऱ्या काळात ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे दिवा शहर अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी दिला आहे.
.jpeg)