तलासरी: जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेशजी सांबरे. यांच्या वाढदिवसानिमित्त तलासरी तालुक्यात १०० जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा नुकताच संपन्न झाला. तलासरी बस डेपो मैदान मध्ये सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी आदिवासी समाजातील अनेक उपवर युवक युवतींचा विवाह सोहळा जिजाऊ शैक्षणिक व समाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. सामुदायिक विवाह सोहळा मध्ये आमदार श्रीनिवास वांगा व्ही आणि तहसीलदार श्रीधर उपस्थित होते.
आदिवासी समाजातील गोर गरीब कष्टकरी कुटुंबात अनेकांना दोन वेळची पोटाची भ्रांत भागवण्यासाठी मोल मजुरी करावी लागते अश्या परिस्थितीत घरात एखादे लग्न कार्य करायचे म्हटले तरी कर्ज काढावे लागते . समाजाच्या रूढी परंपरेत अडकलेला बहुतांश वर्ग मग अनावश्यक खर्चापायी कर्जात अडकतो . यात परिवर्तन व्हावे आणि या समाजबांधवांचा अनावश्यक खर्च टाळला जावा या हेतूने जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत सामुदायिक विवाह सोहळ्याचे तलासरी येथे आयोजन केले होते. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अनेकांनी हा प्रेरणादायी विचार आपण पुढे घेऊन जाणार असल्याचे यावेळी सांगितले.
ठाणे व पालघर जिल्ह्यात १ एप्रिल ते ३० एप्रिल असा महिनाभर जिजाऊ महोत्सव साजरा करत अश्याच प्रकारे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. तळागाळातल्या गोर गरीब समाजबांधवांडना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिजाऊ संस्था ही २००८ पासून ठाणे जिल्हा पालघर जिल्हा कोकण भागांत कार्यरत आहे.
