नवी मुंबई : महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी देयक वसुलीसाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्या होत्या. त्याचीच पोचपावती म्हणून पाणीपुरवठा विभागाने ७९ कोटी ८० लाख रुपयांची पाणी देयकाची वसुली करण्यात आली आहे.
यंदा २०२२-२३ या आर्थिक वर्षामध्ये करण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून पाणी देयकापोटी ८४ कोटी २५ लाख रुपयाचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. त्यापैकी ३१ मार्च अखेर प्रत्यक्ष ७९ कोटी ८० लाख रुपयांच्या पाणी देयकाची वसुली झाली आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी २ हजार ४६० नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तसेच १ लाख रुपयांहून अधिक रकमेची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांना लोकआदलतीच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. सलग ३ देयके न भरणाऱ्यांना चौथ्या देयकाच्या सोबत नळ जोडणी खंडित करण्याच्या नोटिसा नियमितपणे बजावल्या जात होत्या.
मुंबई महापालिकेनंतर स्वतःच्या मालकीचे धरण असणारी राज्यातील नवी मुंबई ही एकमेव महापालिका आहे.सध्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून घरगुती, संस्था आणि वाणिज्य अशा नळ जोडण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण १ लाख ३५ हजार ८८९ ग्राहक आहेत. शहरातील अनेक भागांना २४ तास पाणीपुरवठा करून अखंडित सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. पाणीपुरवठा विषयी आलेल्या कोणत्याही तक्रारींची त्वरित नोंद घेऊन २४ तासात तिचे निवारण केले जाते.
.jpeg)