सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणही उपस्थित
डोंबिवली / शंकर जाधव : भारतीय जनता पार्टीचे पश्चिम मंडल युवा अध्यक्ष कृष्णा बाळाराम पाटील आणि रसिका कृष्णा पाटील यांनी जुनी डोंबिवली विभागात श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त महाआरतीचे आयोजन केले होते. या महाआरतीसाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण खास लोकाग्रहास्तव हजर होते. बजरंगबली की जय म्हणत मोठ्या जल्लोषात " सुखकर्ता दुःखहर्ता " आरतीने महाआरतीला प्रारंभ झाला. या सोहळ्यात महिलांनी संपुर्ण परिसर भरगच्च भरून गेला होता. जुनी डोंबिवलीत प्रथमच महाआरतीचा सोहळा झाल्याने एक वेगळे आकर्षण होते.
जुनी डोंबिवली चौकात मोठा सभामंडप बांधण्यात आला होता. गदाधारी श्री हनुमानाची पाच फूट उंचीची मूर्ती लक्षवेधी अशीच होती. संपूर्ण व्यासपीठ भगवेमय करण्यात आले होते. दरम्यान सुमधुर "श्री हनुमान चालीसा" पठणही झाले.
कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांचे आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करत बजरंग बली की जय, जय श्रीराम अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कृष्णा पाटील यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांचे यथोचित स्वागत केल्यानंतर महाआरती ला सुरुवात झाली. उपस्थित महिलांनी पारंपरिक पेहराव केला होता तर तमाम पुरुषांनी डोक्यावर भगव्या टोप्या धारण केल्या होत्या.
महाआरतीला भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, पूर्व मंडल अध्यक्ष नंदकुमार जोशी, विष्णुनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव, भाजपचे स्थानिक जेष्ठ नेते निळकंठ दळवी, डॉ. सर्वेश सावंत, बाळाराम पाटील, पदाधिकारी गणेश निंबाळकर, दिनेश जाधव, पद्माकर (बाळू) ठाकूर यांच्यासह जुनी डोंबिवली ग्रामस्थ आणि विभागातील स्त्री-पुरुष नागरीक मोठया संख्येने हजर होते. यावेळी शिव कल्याण ढोल ताशा पथकच्या वादनाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच एकदंत भजन पथकाने श्री हनुमान कथा आधारित भजने सादर केली.
