मुंबई:जव्हार अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने दिनांक २५ एप्रिल २०२३ च्या संचालक मंडळाच्या सभेत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. बँकेतील पूर्वीचे संचालक मंडळ व बँक अधिकारी यांनी संगनमताने केलेल्या गैरकारभाराची लक्तरे आता चौकशीत उघड्यावर पडू लागली आहेत. त्यामुळे आता अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यानिमित्ताने निलेश सांबरे यांनी संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचारा दरम्यान गैरकारभार करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांची मुजोरी सहन केली जाणार नाही; त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे दिलेले आश्वासन पूर्णत्वास आल्याचे बोलले जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, माहे ऑक्टोबर २०१७ मध्ये बँकेचे कॅशियर जावेद सत्तार मेमन यांनी संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत अफरातफर केल्याचे उघडकीस आले होते. जावेद सत्तार मेमन यांनी अफरातफर केल्याचे मान्य करून त्याची जबाबदारी स्वीकारून दिनांक २५/०७/२०१७ रोजी बँकेच्या संचालक मंडळाकडे राजीनामा सादर केला होता. जावेद मेमन दि. ६ ऑक्टोबर २०१७ रोजी बँकेचे व्यवस्थापक नामदेव खंदारे यांना संजय गांधी निराधार योजनेच्या रक्कमेत अफरातफर केल्याचे स्टॅम्प पेपरवर सत्यप्रतिज्ञापत्राद्वारे लिहून दिले आहे. या प्रतिज्ञापत्रात जावेद मेमन यांनी संजय गांधी निराधार योजनेत अफरातफर केलेल्या रक्कमेची भरपाई म्हणून त्यांच्या ग्रॅच्युइटीची रक्कम रुपये सात लाख ही त्यांनी बँकेकडे सुपूर्द केली होती व आपल्या सेवेचा राजीनामा दिला. सदर राजीनाम्यात देखील त्यांनी ही रक्कम सुरक्षा अनामत म्हणून बँकेत जमा केल्याचे नमूद केले होते. हा राजीनामा तत्कालीन संचालक मंडळाने मंजूर केला आहे.
जावेद सत्तार मेमन यांनी अफरातफर केलेल्या रक्कमेपोटी नवनिर्वाचित संचालक मंडळाने भरपाई म्हणून बँकेस सुपूर्द केलेल्या रक्कमे बाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता या रक्कमेचा व्यवस्थापक यांनी बँकेत भरणाच केला नसल्याचे उघडकीस आले. बँकेचे व्यवस्थापक खंदारे यांच्याकडे याबाबत संचालक मंडळाने विचारणा केली असतां त्यांनी त्यांच्याकडे जमा केलेली रक्कम बँकेत भरणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी बँकेच्या तिजोरीत सदर रक्कम दिनांक २५ मार्च २०२३ रोजी ठेवल्याचे सांगितले. सुमारे पाच वर्षे त्यांनी ही रक्कम बँकेत जमा न करण्याची कृती नवनियुक्त संचालक मंडळास संशयास्पद वाटली. म्हणून संचालक मंडळाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली असता प्रामुख्याने पुढील बाबी उघडकीस आल्या आहेत.
या सर्व प्रकरणात प्राथमिक चौकशीत ते दोषी आढळून आल्यामुळे दि. 25 एप्रिल 2023 च्या संचालक मंडळाच्या सभेत त्यांना निलंबन करण्याचा ठराव बँकेचे व्हाईस चेअरमन प्रवीण राजाराम मुकणे यांनी मांडला आणि संचालक मंडळाने हा ठराव सर्वानुमते पारित केला आहे, अशी माहिती बॅंकेचे चेअरमन हबिब अहमद शेख यांनी दिली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी ५ सदस्यांची चौकशी समिती नेमण्यात यावी व चौकशीअंती संबंधित अधिकारी दोषी आढळल्यास त्यांचे विरुद्ध खातेनिहाय चौकशी सुरू करून; जरूर तर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बँकेच्या संचालक मंडळाने केली आहे. खंदारे यांना या प्रकरणी न्याय दृष्टीकोनातून बाजू मांडण्याची संधी देण्यात यावी, अशी विनंती व्हाईस चेअरमन प्रवीण मुकणे यांनी संचालक मंडळाच्या सभेत केली होती. त्यानुसार खंदारे यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसांची नोटिस देऊन त्यांच्याकडून या प्रकरणी लेखी खुलासा मागविण्यात आला आहे.
नामदेव खंदारे यांच्या निलंबनाचां आदेश दि. २५ एप्रिल २०२३ रोजी चेअरमन हबिब शेख यांच्या स्वाक्षरीनिशी निघाला आहे. त्यामुळे खंदारे त्यांच्या पदाचा प्रभारी कार्यभार बँकेचे उप व्यवस्थापक प्रसाद बाबुराव मुकणे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.