मुंबई, : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील (एसआरए) सशुल्क पुनर्वसन योग्य झोपडीधारकांच्या सदनिकेची किंमत २ लाख ५० हजार निश्चित करण्यात आली आहे असे परिपत्रक गृहनिर्माण विभागाने काढल्याने आता हजारो सशुल्क रहिवाशांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने नागरी भागाकरिता सन २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरे चे उद्दिष्ट विचारात घेऊन महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा, निर्मूलन व पुनर्वसन अधिनियम १९७१ मधील तरतूदी नुसार राज्यातील महापालिका,नगरपालिकेतील दि १ जानेवारी २००० च्या संरक्षणपात्र झोपडीधारकांना मोफत घर मिळण्याचे स्पष्ट केले.
मात्र १ जानेवारी २००० दिनांकानंतरचे परंतु १ जानेवारी २०११ पूर्वीच्या झोडीधारकांना सशुक्ल पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने एसआरए योजनेत सशुक्ल पुनर्वसन योग्य आढळलेल्या झोपडीधारकांना पात्र करून त्यांच्या कडून वसूल करावयाच्या सदनिकेची किंमत ठरविण्यासाठी गृहनिर्माण विभागाने ७ सप्टेंबर २०१८ रोजी परिपत्रक काढून एसआरएतील झोपडीधारकांचे पुनर्वसन करताना त्यांच्या सदनिकेची किंमत निश्चित करताना प्रकल्पातील पुनर्वसन घटकाच्या एकूण बांधकाम खर्च, प्रकल्पातील प्रस्तावित केलेल्या अत्यावश्यक व अन्य पायाभूत सुविधांच्या विकासासाठी येणारा खर्च,एसआरएचा स्थिर दराचा इतर प्रशासकीय खर्च या तीन निकषांचा विचार करून एसआरएचे मुख्यअधिकारी किंमत जाहीर करतील असे आदेश दिले.
यानुसार एसआरए प्राधिकरणाने सशुक्ल झोपडीधारकांना आडिज लाखांत घर देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला. यानुसार गृहनिर्माण विभागाने परिपत्रक काढल्याने किंमती अभावी बेघर असलेल्या हजारो झोपडीधारकांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.