कल्याण- डोंबिवलीत ६ लाख वृक्ष
डोंबिवली / शंकर जाधव : कल्याण- डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांचे निर्देशानुसार महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण अधिनियम १९७५ च्या तरतुदीनुसार महानगरपालिकेच्या उदयान व वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत वृक्ष गणनेस सुरुवात झाली. आता हीच वृक्ष गणना अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन केली जाणार आहे
महापालिकेने मागील वृक्ष गणना २००७ साली केली होती. महापालिका क्षेत्रात सुमारे ६ लाख झाडे अपेक्षित असून साधारण पणे १५ महिन्यात पूर्ण होईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव यांनी दिली आहे. वृक्ष गणनेसाठी अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार असून यात मोबाईल ॲप सॉफ्टवेअर आणि डॅशबोर्ड असेल.महापालिका क्षेत्रातील प्रत्येक झाड, सार्वजनिक जागा, मोकळया जागा, औदयोगिक परिसर इतकेच नव्हे तर खाजगी मालमत्तेतील प्रत्येक झाडाची गणना करुन रेकॉर्ड जतन केले जाणार आहे. यामध्ये ५० वर्षांहुन जास्त जुन्या वृक्षाची म्हणजेच हेरीटेज वृक्ष यांची देखील गणना केली जाणार आहे. वृक्ष लागवड कुठे करणे करणे शक्य आहे हे या माध्यमातून पाहिले जाणार आहे. तसेच भविष्याच्या दृष्टीने महापालिका क्षेत्रातील वृक्ष संपदा, महापालिका परिसरात कोणत्या प्रकारची किती झाडे आहेत याची माहिती मिळेल.
