आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवाचा नारा
छत्रपती संभाजीनगर :
आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आंबेडकरवादी पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने छत्रपती संभाजीनगरात भव्य एल्गार मोर्चा काढण्यात आला. “आरक्षण वाचवा, उपवर्गीकरण हटवा” या घोषवाक्याखाली हजारो कार्यकर्त्यांनी आमखास मैदान ते विभागीय आयुक्त कार्यालय असा मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली.
सोमवारी दुपारी आमखास मैदानातून मोर्चाची सुरुवात झाली. घोषणाबाजी करत मोर्चेकऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून कूच करत विभागीय आयुक्त कार्यालय गाठले. “आरक्षण वाचवा” आणि “वर्गीकरण हटवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला.
या मोर्चात अनेक ज्येष्ठ नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. दिनकर ओंकार, प्रकाश निकाळजे, गौतम लांडगे, सतीश गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, रमेश गायकवाड, अॅड. रमेशभाई खंडागळे, प्रवीण जाधव, विजय वाहूळ, मुकुंद सोनवणे, कृष्णा बनकर, लक्ष्मण हिवराळे, मुन्ना बोरडे, राजू साबळे, बंडू कांबळे, पंडित बोर्डे, सुनील वाकेकर, राहुल साळवे, मनोज वाहूल, संतोष भिंगारे, प्रा. किशोर जाधव, अरुण शिरसाठ, रवी जावळे, नाना म्हस्के, जयश्री शिरके आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
हा मोर्चा केवळ आरक्षणाच्या मुद्द्यावर मर्यादित नसून समाजाच्या अस्तित्व, हक्क आणि स्वाभिमानाशी निगडित असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले. यासाठी सर्व आंबेडकरवादी कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले.