आ. नाईक यांचे प्रतिपादन
नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रातील लोककल्याणकारी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात भाजपतर्फे विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या वतीने ऐरोली विधानसभा मतदारसंघासाठी वाशी येथे व्यापारी वर्गाकरिता स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार नाईक यांनी व्यापारी वर्ग हा भाजपचा खंदा समर्थक असून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत व्यापारी आणि आर्थिक महासत्ता म्हणून विश्वात उदयास येईल, असा विश्वास व्यक्त केला.
वाशी येथील गुजरात भवनमध्ये व्यापारी बंधूंच्या भरगच्च उपस्थितीमध्ये व्यापारी संमेलन पार पडले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदी सरकारच्या नववर्षांच्या कामगिरीवर प्रकाशझोत टाकणारी ' सेवा सुशासन आणि गरीब कल्याण' चित्रफीत दाखवण्यात आली. आमदार नाईक यांनी पंतप्रधान मोदी यांच्या मागील नऊ वर्षांच्या कार्यकाळामध्ये देशातील सर्व घटकांचे हित समानतेने साधले गेल्याचे सांगितले. जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाला गांभीर्याने घेतले जाऊ लागले आहे. भारताचे लष्करी सामर्थ्य वाढले त्यामुळे भारताकडे वाकडा डोळा करून पाहण्याची शत्रू राष्ट्रांची हिंमत होत नाही. नरेंद्र मोदी यांनी राबविलेल्या धोरणांमुळे भारत जगामध्ये पाचवी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जगात एक नंबरचा देश बनेल, असा विश्वास व्यक्त करून सर्वात प्रथम ज्या घटकांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर विश्वास ठेवला तो घटक व्यापारी वर्ग होता असे त्यांनी आवर्जून सांगितले.
संजीव नाईक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारताचा जगात सन्मान वाढल्याचे सांगितले. मोदी सरकारने व्यापाऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना सुरू केल्या यामध्ये पेन्शन योजना, व्यवसायाकरता सुलभ मुद्रा कर्ज योजना, डिजिटल पेमेंट सुविधा अशा अनेक योजनांचा समावेश आहे. नवी मुंबईच्या विकासामध्ये व्यापारी वर्गाचे मोठे योगदान आहे, असे ते म्हणाले.
