भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
दिवा, : खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभेतील भाजपच्या भूमिकेवर दिलेल्या प्रतिक्रिये बाबत आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी दिवा शिवसेनेने भाजप कार्यकर्त्या विरोधात दिवा पोलीस चौकीवर धडक दिली. यानंतर रात्री उशिरा मुंब्रा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती शिवसेना नेत्याने दिली.
आक्षेपार्ह भाषेत कमेंट करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत दिव्यातील सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिवा पोलीस चौकीला घेराव घातला.
खासदार श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभे बाबत भाजपच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना वेळप्रसंगी मी राजीनामा देईन पण युती टिकवेन अशी प्रतिक्रिया दिलेली पोस्ट दिवा न्यूज या व्हाट्स अप ग्रुपवर फॉरवर्ड झाल्यानंतर त्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह भाषेत कमेंट करण्यात आल्या. यामुळे शिवसेनेचे नेते रमाकांत मढवी, शैलेश पाटील, आदेश भगत, निलेश पाटील यांनी दिवा पोलीस चौकीवर रात्री धडक देत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी जमा झाले होते. दरम्यान आक्षेपार्ह भाषेत कमेंट केल्या प्रकरणी भाजपचे युवा अध्यक्ष सचिन पाटील, भाजपच्या दिवा महिला अध्यक्षा ज्योती पाटील, रोशन भगत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत बोलताना दिवा शिवसेनेचे उपशहर प्रमुख आदेश भगत म्हणाले की, दिव्यातील भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या नेत्यांवर टीका करताना भाषेची मर्यादा पाळली नाही तर आमच्याकडूनही तसेच उत्तर दिले जाईल अशी प्रतिक्रिया आदेश भगत यांनी दिली.
Tags
महाराष्ट्र
.jpeg)