कापडी पिशवी घ्या, जुनी झाली की परत आणून द्या उपक्रम
डोंबिवली / शंकर जाधव : कल्याण-डोंबिवलीला प्लास्टिक पिशव्यांपासून मुक्त करण्याच्या उद्देशाने पालिका प्रशासन पावले उचलत असताना आता व्यावसायिकांनी देखील पुढाकार घेत कापडी पिशवी घ्या, जुनी झाली की परत आणून द्या असा उपक्रम सुरू केला आहे. यामुळे डोंबिवलीत या अनोख्या उपक्रमाची चर्चा जोरदार सुरू आहे.
अक्षय्य थैली माझ्या हाती, प्लास्टिकपासून कायमची मुक्ती, जुनी होता, खराब होता, टाकून नाही द्यायची,परत देऊन विनामूल्य नवीन थैली घ्यायची असा संदेश देत प्लास्टिकमुक्तच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
डोंबिवलीतील काही व्यावसायीकांनी एकत्र येऊन पर्यावरण स्नेही अक्षय्य थैली म्हणजेच कापडी पिशवी मोफत वाटण्याचे ठरवले आहे. पर्यावरणीय दृष्टीने प्लास्टिक वापरणे अत्यंत धोकादायक आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार प्लास्टिक पिशवी वापरू नये असे सांगण्यात आले. मात्र असे असले तरी अनेक विक्रेते प्लास्टिक पिशवीचे वाटप मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
अनेक नागरिक चक्क प्लास्टिक पिशवी मागून घेतात. या गोष्टीवर आळा घालण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. हा उपक्रम सहा महिने चालवणार असून या चळवळीत आणखी कोणी सहभागी झाले, तर वर्षभर देखील हा उपक्रम राबवणार असल्याचे सांगतानाच घरातील प्लास्टिकचा कचरा कमी होईल अशी आशा व्यावसायीकांनी व्यक्त केली आहे.
रजनीगंधाचे विपुल वैद्य, प्रथमेश नोवेल्टीचे अमोल पाटणकर आणि ऑर्गोवॅलीचे नितेश महाडिक या सर्व व्यवसायिक एकत्र येऊन हा उपक्रम राबवत आहे. विशेष म्हणजे ही पिशवी फाटली, जुनी झाली किंवा खराब झाली तर टाकून द्यायची नाही तर ती पुन्हा या व्यावसायीकांना आणून द्यायची त्या ऐवजी ते दुसरी पिशवी तुम्हाला मोफत देणार असे व्यावसायिक विपुल वैद्य यांनी सांगितले.
