सरकारी आश्वासने हवेतच, मनसेकडून मदतीचा हात
ठाणे \ बदलापूर : एका आईच्या डोळ्यातील काळजी, मुलीच्या भविष्याची असलेली धास्ती आणि शिक्षण टिकवण्यासाठी सुरू असलेली धडपड… बदलापूरमधील ‘सानिका’ (बदललेले नाव) या चिमुरडीची कहाणी सध्या मन हेलावून टाकणारी ठरत आहे. राज्याला हादरवून टाकणाऱ्या बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर शाळेतील त्या दुर्दैवी घटनेला आता दोन वर्षांचा कालावधी उलटला असला, तरी न्याय आणि शिक्षणासाठीचा संघर्ष अजूनही कायम आहे.
घटनेनंतर शासनाने या विद्यार्थिनीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तिच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शासन उचलणार असल्याचे सांगितले होते. तसेच पुढे पदवीपर्यंत शिक्षणाची जबाबदारी घेण्याची घोषणाही करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात या आश्वासनांची पूर्तता अद्याप झालेली नाही, अशी तक्रार पीडित कुटुंबाकडून करण्यात येत आहे.
मुलीच्या वडिलांनी शिक्षण विभागाकडे वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस मदत मिळाली नाही. उलट शाळेकडून थकलेल्या फीबाबत सतत तगादा लावला जात असल्याने कुटुंबाची चिंता अधिकच वाढली आहे. या प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून जाब विचारला आहे. शासनाने दिलेल्या वचनांची तातडीने पूर्तता करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, न्यायासाठी न्यायालयीन लढा सुरू असतानाच शिक्षणासारख्या मूलभूत हक्कासाठीही या कुटुंबाला संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. “मुलीच्या भविष्यासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. शासनाने दिलेल्या आश्वासनांनुसार मदत मिळावी,” अशी भावनिक विनंती मुलीच्या वडिलांनी केली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे प्रशासकीय यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पाचंगे यांची आर्थिक मदत
पीडित मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालल्याचे पाहून तिच्या वडिलांनी मनसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांच्याशी संपर्क साधला. परिस्थितीची जाणीव होताच पाचंगे यांनी तत्काळ पुढाकार घेत हायस्कूलची गतवर्षीची ३२,००० रुपयांची थकलेली फी स्वतःच्या खिशातून चेकद्वारे भरली.एकीकडे सरकार समृद्ध राज्याच्या गप्पा मारते आणि दुसरीकडे अन्यायग्रस्त चिमुरडीला दिलेल्या शब्दाला जागत नाही, ही लाजीरवाणी बाब आहे, अशी टीका पाचंगे यांनी केली.
