पालिकेचे एकही वाहन पार्किंग उपलब्ध नाही!
दिवा/ आरती मुळीक परब: दिवा शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असताना शहरात वाहनांची संख्या देखील वाढत आहे. त्यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने दिवा शहरासाठी आतापासूनच पार्किंग धोरण राबवण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच भविष्यात पार्किंग समस्या गंभीर होण्या आधी उपाय योजना केली पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
सध्या दिवा शहरातील प्रमुख रस्त्यांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्याने रस्त्याच्या बाजूला कुठेही पार्किंग उपलब्ध असलेले दिसत नाही. दिवा शहराला शिस्त लागण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरात लक्ष घालणे गरजेचे आहे. शहरात पे अँड पार्क साठी पालिके मार्फत कोणतीही व्यवस्था नाही. दुसरीकडे दिवा शहरातील इमारतींना पार्किंग व्यवस्था उपलब्ध नाही. परिणामी नागरिक भेटेल त्या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करत असतात. यामुळे अनेक वेळा गाड्यांचे नुकसान होणं, त्याचबरोबर वाहतुकीत अडथळा येणे अशा प्रकारच्या गोष्टी होत असतात. भविष्यातील पार्किंग समस्येचा प्रश्न लक्षात घेऊन संबंधित विभागाने दिवा शहरातील प्रमुख रस्त्यांचे सर्वेक्षण करून या रस्त्यांवर एका बाजूने पे अँड पार्क सुविधा आतापासूनच सुरू करून शहराला एक शिस्त लावावी अशी मागणी वाहन चालकांकडून होत आहे.
दिवा शहरातील इमारतींना, चाळींना पार्किंग सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांना वाहने ही रस्त्यावरच पार्क करावी लागतात. परंतु फेरीवाल्यांचा रस्त्यावर असणारा कब्जा यामुळे वाहन पार्किंग करण्यास अनेक वाहन चालकांना अडथळे येतात. महापालिकेने मुख्य रस्त्यांवरील काही भाग हे वाहन पार्किंगसाठी पे अँड पार्क पद्धतीने उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा दिवा शहरातील वाहन चालकाना होईल. भविष्यातील गंभीर प्रश्न टाळण्यासाठी प्रशासनाने आताच लक्ष दिल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटण्यास मदत होईल.
.jpeg)